। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या सुराबा नाना टिपणीस सभागृहात सद्भावना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी अधिकारी, कर्मचारी यांना सद्भावना शपथ दिली.
माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस भारतामध्ये सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. सद्भावना दिवसाचे औचित्य साधून सद्भावना शपथ दिली जाते. देशामध्ये राष्ट्रीय एकता, शांती, प्रेम टिकून रहावं आणि वृद्धिंगत व्हावं हा यामागील उद्देश आहे.
सर्वप्रथम माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, त्यांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून आदरांजली वाहण्यात आली. त्यांनतर सद्भावना शपथ घेण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी जोत्स्ना शिंदे-पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी पूनीता गुरव, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.