। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईमध्ये शिवसेनेच्या गडात भाजपच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी ठिकठिकाणी उभारलेल्या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गटातील तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच दिसून आली.
फडणवीस यांनी वरळी येथील जांबोरी मैदान येथे भाजप कार्यकर्त्यांनी उभारलेल्या दहीहंडीला हजेरी लावली. यावर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, राजकीय दहीहंडी कुठेही केलेली नाही. दोन वर्षांच्या कोविडच्या काळानंतर सर्वजण अत्यंत आनंदाने हा उत्सव साजरा करत आहेत. आज मला राजकीय बाबींवर भाष्य करायचं नाही. आज कार्यकर्त्यांना, नागरिकांना या उत्सवाचा पुरेपूर आनंद घेऊ द्या. वरळी सगळ्यांना आवडू लागली आहे. मी त्या बालिशपणात जाणार नाही. ज्यांना हा उत्सव जिथे साजरा करायचा आहे, तिथे करू द्या, असे ते म्हणाले.