। रसायनी । वार्ताहर ।
वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गरजू गोरगरीबांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी माजी सरपंच संदिप मुंढे व हरेश उतेकर यांच्या सहकार्यातून हेल्प एज इंडिया व सिप्ला फाउंडेशन यांच्या मदतीने शिवनगर, मोहोपाडावाडी, काळणाचीवाडी, रिसवाडी, घोसाळवाडी याठिकाणी मोफत फिरता दवाखान्यांचे उद्घाटन मंगळवारी (दि.6) करण्यात आले.
यावेळी शिवनगर वाडीत आरोग्य विषयक तपासणी करून आजार असणार्यांना मोफत औषधोपचार देण्यात आले. यात प्राथमिक स्वरूपाचे सर्दी, खोकला, ताप, मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, संधीवात, अंगदुखी इत्यादी आजारांवर डॉ. धर्मराज लुबल यांनी तपासणी करून नागरिकांना आजारविषयक मार्गदर्शन केले. यावेळी संदिप मुंढे, संतोष मैदर्गीकर, हरेश उतेकर, सारिका कांबळे, संतोष भुजबळ, विद्या पांचाळ, युवराज करण, मंगेश महाडिक, संजय गुप्ता आदींसह शिवनगर वाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.