शिवसेना नेत्या अंधारे यांचा आरोप
। महाड । प्रतिनिधी ।
देशातील सत्तास्थानी भारतीय जनता पक्षाकडून संविधानाची पायमल्ली केली जात असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी महाड येथे आयोजित संविधान सुरक्षा आंदोलनाच्या प्रसंगी बोलताना केला आहे.
महाडच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या संविधान सुरक्षा आंदोलनामध्ये माजी खासदार हुसेन दलवाई, सुषमा अंधारे यांच्याशिवाय कार्यक्रमाचे प्रमुख माजी खासदार मौलाना ओबेद्दुला आझमी, राजरत्न आंबेडकर व हबीब फकी यांसह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, बेलदार समाजाचे नेते रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी अंधारे यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला. सरकारच्या विरोधात बोलणार्यांचे तोंड बंद करण्यासाठी ईडी व सीबीआयचा वापर केला जात असून मुस्लिमांनी हक्कांसाठी काही बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याला दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. काही वर्षांपूर्वी गॅसवर झालेल्या महागाई संदर्भात बोलणार्या केंद्रीय मंत्री इराणीबाई आता इराणला गेल्या का, तेच कळत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
माजी खासदार हुसेन दलवाई यांनी देशाच्या नावाने घटना बरबाद करण्याचे काम मोदी सरकार करत असून या देशाला 1925 सालापासून हिंदूराष्ट्र बनविण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचा आरोप केला.
सामाजिक कार्यकर्ते व बेलदार समाजाचे राज्यस्तरीय नेते रवींद्र चव्हाण यांनी आपण हिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा पुरस्कर्ता असल्याचे मत व्यक्त करून सध्या राज्यात व देशात लव्ह जिहाद हा फक्त हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावण्यासाठी वापरला जात असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमाला कोकण विभागातील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले होते. संविधान सुरक्षा आंदोलन यशस्वी व्हावे, यासाठी रऊफ फजदार, किरण बाथम, डॉ. मुश्ताक मुकादम, दिलदार पुरकर, अकबर ताज व एफएम ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.