चिरनेर | वार्ताहर |
उरण – पनवेल रोडवरील सिडको ऑफिस शेजारी कोसळण्याच्या स्थितीत असलेला पूल व फुंडे गावा शेजारी 5 महिन्यापूर्वी कोसळलेला पूल यामुळे फुंडे, पाणजे, डोंगरी गावातील ग्रामस्थांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली आहे. सिडको कार्यालय जवळील पूल कधीही कोसळू शकतो. जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या मार्गांवर वाहनांना बंदी घालण्यात आली असून वाहने दुसर्या मार्गाने वळविली जात आहेत.कोसळलेला पूल आणि धोकादायक पूल अशा
दोन पुलांच्या मार्गामुळे फुंडे,डोंगरी व पाणजे या तीन गावांचा रहदारीचा मार्ग तुटला आहे. तर 3 महिन्यापूर्वी फुंडे येथील पूल कोसळल्याने दिपक कासुकर या तरुणांचा मृत्यू झाला होता. मात्र या ठिकाणी अजूनही नवीन पूल बांधण्याच्या हालचाली सिडको प्रशासनाने केल्याच नाहीत. त्यामुळे फुंडे,डोंगरी व पाणजे या तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.शासकीय कार्यालयात जाणे – येणे तसेच बाजार व नोकरीनिमित्त येण्या-जाण्यासाठी सुमारे 10 ते 12 किलोमीटरचा वळसा घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे अधिक वेळ व खर्च वाया जात आहे. जास्त प्रमाणात खर्च होत आहे.याचा नाहक त्रास फुंडे, डोंगरी व पाणजे गावातील नागरिकांना होत आहेत. त्यामुळे सिडको प्रशासनाने कोसळलेला फुंडे गावाजवळील फुल व धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेला सिडको बसथांब्यावरील उरण – पनवेल रस्त्यावरील पुलही तात्काळ बांधण्याची मागणी फुंडे गावकर्यांच्या वतीने सिडको प्रशासनास करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ तसेच फुंडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य -ऍड कैलास म्हात्रे,डोंगरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच दर्शना घरत, माजी सरपंच अशोक ठाकूर,नंदकुमार म्हात्रे, रमेश म्हात्रे, विलास म्हात्रे आदी मान्यवरांनी सिडको कार्यालय द्रोणागिरी नोड – 1 येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता आशिष कोब्रागडे यांची भेट घेऊन तीन गावांची गैरसोय होत असल्याने नवीन पुलाची उभारणी तातडीने करावी या आशयाचे निवेदन सादर केले आहे.याशिवाय पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी अशीही मागणी केली आहे.