बीडमध्ये शेकापचे संपर्क अभियान; जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रम – मोहन गुंड
| वडवणी | प्रतिनिधी |
बीड शेकापच्यावतीने जागर रयतेचा लढा मातीचा हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकर्यांच्या प्रश्नांवर जागृती करण्यासाठी जिल्हाभर गावोगावी शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, महिला यांच्यामध्ये जागृती निर्माण करून व्यवस्थेचा बळी ठरलेला शेतकरी लढायला उभा करणे या अभियानाचा प्रयत्न आहे, हे अभियान वर्षभर चालणार असून जिल्ह्यात एक गाव एक सभा घेण्याचा संकल्प या अभियानात करण्यात आला असल्याची माहिती शेकाप नेते मोहन गुंड यांनी दिली.
या अभियानाच्याद्वारे शेकाप नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकूण 500 सभा घेणार असून या अभियानाची सांगता 17 सप्टेंबर 2023 रोजी भव्य शेतकरी मेळावा घेऊन करण्यात येणार आहे.
अभियानाची सुरुवात शनिवारी ( 17सप्टेंबर) सकाळी वडवणी तालुक्यातील देवळा या गावी जागर सभा घेऊन करण्यात आली. या वेळी रावसाहेब पाटील, बाबुराव जाधव, मोहन गुंड, अॅड. नारायण गोले पाटील, गणपत कोळपे, अशोक रोडे, अॅड निखिल बचुटे, मुंजा पांचाळ, भरत किनोळकर उपस्थित होते, या वेळी सेवानिवृत्त मंडळाधिकारी पद्माकर मुळाटे यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला .
बीड जिल्हयात शेतकरी कष्टकरी, कामगार यांची दिवसेंदिवस आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे, शिक्षणाचे बाजारीकरण, वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, शेतीमालाची कवडीमोल किमतीत शासनाकडून होत असलेली खरेदी व राजकीय उदासीनता या प्रश्नाने जनता त्रस्त झाली आहे. दिवसेंदिवस शेतकर्याच्या वाढत चाललेल्या आत्महत्येचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्याला वाचा फोडायची असेल तर एकजुटीने व्यवस्थेविरुद्ध लढल्या शिवाय पर्याय नाही या साठी जनजागृती व्हावी म्हणून संपर्क अभियान बीड जिल्ह्यात राबवत असल्याचे मोहन गुंड यांनी व्यक्त केले.
या वेळी भाई बाबुराव जाधव यांनी मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यात शेतकरी कामगार पक्षाचे नेते अग्रभागी असल्याचे मत व्यक्त केले, या व्यवस्थेत शेतकरी भर दुपारी लुटला जातो आहे. असे असताना शेतकर्यांच्या मुलांनाच आता ही लढाई पुढं घेऊन जावी लागेल अन्यथा येणार काळ शेतकर्यांसाठी भयंकर असेल या मुळे आपण आपल्या बापाच्या सांडलेल्या रक्ताचा आणि घामाचा हिशोब मागण्यासाठी लढायला तयार व्हा.. असे मत अॅड.नारायण गोले पाटील यांनी व्यक्त केले, कार्यक्रमाचे आयोजक निल कदम यांनी अभियानातून गावकर्यांना जागृतीचा मंत्र दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला सरपंच डॉ. सुरेश शिंदे, ओमप्राकाश शिंदे, बाळासाहेब शिंदे, बी.टी. डोंगर ,पंढरीनाथ निकम, आसाराम बापू खडुळ, विष्णू शेळके यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक, शेतकरी, कामगार,युवक यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.