देशातील प्रत्यक्ष करसंकलन 7 लाख कोटींच्या पुढे
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोना महासाथी संपल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. उद्योग, सेवा क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असतानाच देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 23 टक्कयांनी वाढ झाली आहे. प्रत्यक्ष कर संकलन दिवसेंदिवस वाढत असून चालू आर्थिक वर्षात हा आकडा 7 लाख कोटींच्या पुढे पोहोचला आहे.
याबाबतची माहिती देण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. भारत सरकारच्या धोरणांमुळे कर संकलनात वाढ होत आहे. तसेच कर आकारणी पद्धतीला आणखी साधे, सरळ आणि सोपे करण्याच्या सरकारचा प्रयत्न आहे. करगळती थांबवण्याठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जात आहे, या सर्व गोष्टींमुळे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यास मदत होत आहे, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2022-23मध्ये 17 सप्टेंबर 2022 पर्यंत 7 लाख 659 कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले आहे. मागील आर्थिक वर्ष 2021-22च्या तुलनेत हे करसंकलन 23 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये कॉर्पोरेशन कर (3 लाख 68 हजार 484 लाख कोटी रुपये) आणि सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (3 लाख 30 हजार 490 लाख कोटी) तसेच वैयक्तिक आयकर (झखढ) यांचा समावेश आहे. याच काळात आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 5 लाख 68 हजार 147 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.