तयारीची लगबग, नवचैतन्य, उत्साह
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
नवरात्रोत्सव म्हटले की नऊ दिवस सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. गावागावात घटस्थापनेच्या दिवशी देवी बसतात. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळांमध्ये देखील घटस्थापनेला सरस्वती मातेच्या रूपाने देवी बसवली जाते. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी शाळेत हे उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण नऊ दिवस शाळेत उत्साही व प्रसन्न वातावरण असते. गरबा, हादगा किंवा भोंडला, नाचाच्या फेर्या याबरोबरच विविध कार्यक्रम देखील शाळेत जोरदार राबविले जातात. सध्या जिल्ह्यातील शाळांमध्ये नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये देखील तयारीची लगबग दिसत आहे.
शाळा-शाळांमध्ये साफसफाईला सुरुवात झाली आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक फावल्या वेळेत ही साफसफाई करताना दिसत आहेत काही ठिकाणी वर्गखोल्या रंगवण्याची कामे देखील सुरू आहेत. तर काही शाळांमध्ये देवी ठेवणार्या वर्गखोलीची रंगरंगोटी करणे पताके लावणे, रंगीत कागद चिकटवणे, सजावट करणे अशा प्रकारची कामे विद्यार्थी व शिक्षक करतांना दिसत आहेत. याबरोबरच सामानाची आवरा आवर करणे विविध वस्तू योग्य ठिकाणी लावणे देवी बसवण्याच्या ठिकाणी विद्युत रोशनाई करणे आदि कामे देखील सुरू असलेले पाहायला मिळत आहेत.
या नऊ दिवसांमध्ये कोणी कोणी कोणती कामे करायची कशा प्रकारे रोजचे कार्यक्रम राबवावेत अशी विद्यार्थ्यांची नियोजने देखील सध्या सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. एवढेच काय आदिवासी वाड्या पाड्यांवरील शाळेत देखील नवरात्रोत्सवाची ही लगबग पाहायला मिळत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि जोश पहायला मिळत आहे. दरवर्षी आवर्जून सर्व विद्यार्थी व शिक्षक शारदोत्सवाची वाट पाहत असतात.
नऊ दिवस कार्यक्रम
रोज फावल्या वेळेत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण देखील केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. यातील एक दिवस स्पेशल गरबा खेळाला जातो या दिवशी मुले, शिक्षक नटून थटून येतात. हातात दांडिया घेऊन छान पैकी रास-गरबा खेळतात. एक दिवस भोंडला किंवा हादगाव देखील होतो. यावेळी मुले आपल्या डब्यात विविध खाऊ चे पदार्थ आणतात आणि मग सर्वजण गोलाकार बसून मिळून ते पदार्थ खातात. यावेळी भोंडल्याची गाणी मुले व शिक्षक गातात. काही शाळांमध्ये पालक किंवा ग्रामस्थ नऊ दिवस मुलांसाठी खाऊ ची व्यवस्था करतात कोणी लाडू देते कोणी बुंदी आणते तर कोणी भेळ देते. शाळेतील महिला शिक्षिका देखील नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या परिधान करण्यासाठी उत्सुक असतात एकूणच काय तर या नऊ दिवस अभ्यासाबरोबरच शाळांमध्ये एक वेगळ्या उत्साहाचे आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण पाहायला मिळते. मुलांमध्ये सुद्धा अभ्यास करण्यासाठी नवी प्रेरणा आणि ऊर्मी हे नऊ दिवस घेऊन येतात.
नऊ दिवस विद्यार्थी व पालकांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. तसेच गरबा व भोंडला यांचे देखील आयोजन केले जाते. काही पालक नऊ दिवस विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप देखील करतात. नऊ दिवस अभ्यासाबरोबर मनोरंजन आणि सण देखील मनोभावे साजरा केला जातो.
अमोल जंगम, मुख्याध्यापक
शाळेत खूप छान कार्यक्रम होतात. आम्हा लहान मुलींना साडी नेसून नटूनथटून येऊन गरबा खेळायला खूप आवडते. भोंडल्याच्या वेळी विविध खाऊ मिळतो. सर्व मुले नवरात्रोत्सवात शाळेत खूप मजा करतो.
प्रिया मनीष पाटील, विद्यार्थिनी,