। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथे विलास कदम यांच्या आंबा बागेमध्ये कृषी विभाग व माऊली ग्रीन आर्मी या संस्थेच्यावतीने गरुडा एरोस्पेस या कंपनीच्या ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आनंद कांबळे तालुका कृषी अधिकारी तळा व त्यांचा सर्व स्टाफ तसेच परिसरातील प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या पिकांवर येणार्या कीड व रोगांवर नियंत्रण करण्यासाठी तसेच पाण्यात विरघळणारी खते फवारणी द्वारे पिकांना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. सध्या वेळेवर मजूर मिळणे शक्य होत नाही तसेच महागाईमुळे मजुरी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर उपाय म्हणून ड्रोन द्वारे फवारणी या आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकर्यांना ओळख व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गरुडा एरोस्पेस कंपनीच्या प्रतिनिधींनी या ड्रोन बाबत तांत्रिक माहिती देऊन 7 मिनिटामध्ये 1 एकर क्षेत्रावर प्रत्यक्ष फवारणीचे प्रात्याक्षिक करून दाखवले. त्यानंतर आनंद कांबळे यांनी या तंत्रज्ञानामुळे कशा प्रकारे वेळ व पैसे वाचू शकतात,औषधांचे प्रमाण किती घ्यावे त्याचबरोबर महाडीबीटी द्वारे कृषी विभागामार्फत ड्रोन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी पदवीधर यांना 75% किंवा जास्तीत जास्त 7.5 लाख तसेच वैयक्तिक शेतकर्यांसाठी 50% किंवा जास्तीत जास्त पाच लाख इतके अनुदान उपलब्ध असल्याचे माहिती दिली.







