| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील काळीज खरवली ग्रामपंचायतकरिता आज मतदान झाले. गेली कांही दिवस प्रचार कार्यक्रमातून तणावपूर्ण वातावरण असतानाच मतदान मात्र शांततेत पार पडले. आ.भरत गोगावले यांच्यासाठी या ग्रामपंचायतिची निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे.|
काळीज खरवली ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे मतदान आहे. त्यांनी सकाळीच आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. काळीज खरवली ग्रामपंचायतिची एकूण लोकसंख्या 5192 असून प्रत्यक्ष मतदार संख्या 2800 इतकी आहे.
काळीज खरवली ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य संख्या असून याकरिता बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाचे) आणि महाविकास आघाडीचे 32 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. याठिकाणी सरपंच पदासाठी एकूण 4 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये समीर म्हामुनकर, सखाराम सकपाळ, चैतन्य म्हामुनकर, दुर्गेश पवार यांचा समावेश आहे.
याठिकाणी दुपारी 1 वाजेपर्यंत या ठिकाणी 50 टक्के हून अधिक मतदान होत सायंकाळी जवळपास 75 टक्के हून अधिक मतदान झाले आहे.