अव्वल स्थानावर विराजमान, विराट, रोहित, सूर्याची अर्धशतके
| मुंबई । वृत्तसंस्था ।
टी-20 वर्ल्डकप 2022 मध्ये भारताने सुपर 12 च्या आपल्या दुसर्या सामन्यात नेदरलँडचा 56 धावांनी पराभव करत सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर ग्रुप 2 मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थान देखील पटकावले.
तत्पूर्वी, भारताने दुसर्या सामन्यात नेदरलँडविरूद्ध 20 षटकात 2 बाद 179 धावा केल्या. भारताची रन मशिन पुन्हा एकदा भरात आली असून विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाठोपाठ दोन अर्धशतकी खेळी केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र सलामीवीर के.एल. राहुलला नेदलँडविरूद्ध देखील मोठी खेळी करण्यात अपयश आहे. तो 9 धावा करून बाद झाला. विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 62 धावांची तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराट आणि सूर्याने तिसर्या विकेटसाठी 48 चेंडूत नाबाद 95 धावांची भागीदारी रचली.
भारताने विजयासाठी ठेवलेले 180 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडला तिसर्या षटकात भुवनेश्वर कुमारने पहिला धक्का दिला. त्याने विक्रमजीत सिंगला 1 धावेवर बाद केले. अक्षर पटेलने मॅक्स ओडोडचा 16 धावांवर त्रिफळा उडवत भारताला दुसरे यश मिळवून दिले. पटेलने बास दे लीड्सला 16 धावांवर बाद करत नेदरलँडला तिसरा धक्का दिला. आर. अश्विनने कॉलिन अॅकेरमन आणि टॉम कूपर यांना एकाच षटकात माघारी धाडले.
अश्विन पाठोपाठ मोहम्मद शमीने टिम प्रिंगलला बाद करत शंभरच्या आत नेदलँडला सहावा धक्का दिला. त्यानंतर भुवनेश्वरने एडवर्डला 5 धावांवर बाद करत सातवा आणि वैयक्तिक दुसरा बळी टिपला. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वरनंतर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने देखील विकेट्सचे खाते उघडले. त्याने लोन वॅन बीकला 3 तर फ्रिड क्लासेनला शुन्यावर बाद करत नेदरलँडचा 9 वा फलंदाज माघारी पाठवला. अखेर नेदरलँडच्या शेवटच्या जोडीने ऑल आऊट न देता संघाला 123 धावांपर्यंत पोहचवले.