। मुरूड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात पहाटेच्या वेळेत पारगान-धनगरवाडी परीसरात चोरुन आणलेल्या गुरांची खुलेआम कत्तल केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामस्थांच्यावतीने भूषण हिरवे यांनी मुरुड पोलीसात तक्रार दाखल केली असून सदर प्रकरणी पोलिसांनी अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारगान येथील घटना ताजी असतानाच गारंबीच्या जुन्या पायवाटेवर पाण्याच्या टाकी नजिक पाच बैलांची कत्तल केली आहे. त्यांचे पुर्ण अवशेष सापडले आहेत.
मंगळवारी पहाटे पारगान गावाच्या कच्च्या रस्त्यावर काही अज्ञात गोवंश जनावरांची हत्या करुन जात होते. रहिवाशांच्या ही बाब लक्षात येताच गावकर्यांना घेऊन घटनास्थळी येईपर्यंत हे गुरे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले. ही घटना ताजी असतानाच गारंबीच्या जुन्या पायवाटेवर पाण्याच्या टाकीनजिक पाच बैलांची कत्तल केलेल्या चे पुर्ण अवशेष सापडले आहेत. त्यामुळे सर्व गावकरी नागरिक पुर्णपणे संतप्त झाले आहेत. राजरोस पणे सुरू असलेल्या गुरे चोरणार्या या टोळीचा बंदोबस्त कोण करणार? पोलिस पेट्रोलींग कसली करतात? असा सवाल जनमानसातून केला जात आहे. सदर दोन्ही घटनेची मुरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक खुतिजा शेख पुढील तपास करीत आहेत.तालुक्यातील बर्याचशा भागात गुरांचे मालक आपल्या गुरांना दिवसरात्र मोकाट सोडत असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन अपघात घडत आहेत. याकडे संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यासाठी ग्रामपंचायत व नगरपालिका यांनी कोंडवाडे तयार करून या प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.