पायी दिंडीत कार घुसली; 7 वारकरी ठार तर 5 जखमी
। सांगोला । प्रतिनिधी ।
करवीर तालुक्यातील वठारवाडी-शिये येथील वारकरी पायी कार्तिक वारीसाठी पंढरपूरकडे निघाले होते. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक पायी दिंडी आली असता, मिरज- सांगोला रोडवरील बाह्यवळण रस्त्यावर पायी जाणार्या वारकर्यांच्या पाठीमाघून येणारी कार दिंडीत घुसली. या अपघातात 7 वारकरी ठार झाले असून 5 जण जखमी झाले असल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी (दि.31) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडली.
या अपघातात शारदा आनंदा घोडके , सुशीला पवार, गौरव पवार, सर्जेराव श्रीपती जाधव, सुनिता काटे, शांताबाई शिवाजी जाधव, रंजना जाधव सर्वजण रा. शिये ता. करवीर जि. कोल्हापूर यांचा मृत्यू झाला. तसेच अनिता गोपीनाथ जगदाळे, अनिता सरदार जाधव, सरिता अरुण शियेकर, शानुबाई विलास शियेकर, सुभाष केशव काटे अशी जखमींची नावे असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वठारवाडी-शिये गावातील वारकरी जुनोनी सांगोलामार्गे पंढरपूरला निघाले होती. दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळील बायपास रस्त्यावर ही दिंडी आले असता, भरधाव वेगात कोल्हापूरकडून सोलापूरकडे निघालेल्या कार (एम.एच.13 डी.ई. 7938) पाठीमाघून दिंडीत घुसली आणि वारकर्यांना धडक दिली. याप्रकरणी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.