चौघांविरुद्ध सीबीआयचा गुन्हा दाखल
| उरण | वार्ताहर |
देशाच्या सर्वात महत्त्वाच्या बंदरांपैकी एक असलेल्या जेएनपीटीमधील 800 कोटींच्या भल्यामोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड झाला आहे. त्यामध्ये तत्कालीन मुख्य व्यवस्थापकासह टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्ससारख्या नामांकित कंपन्यांचाही हात असल्याचे उघड झाले आहे. सीबीआयच्या चौकशीतून हा भ्रष्टाचार बाहेर आला असून, याप्रकरणी जेएनपीएचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक सुनील कुमार मदभावी, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे प्रकल्प संचालक देवदत्त बोस, तसेच बोस्कालीसस्मीत इंडिया (मुंबई) आणि जान दे नुल ड्रेगिंग (चेन्नई) या कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या महाघोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने मुंबई व चेन्नईतील पाच ठिकाणी छापे टाकून धडक कारवाई केली आहे. यावेळी जेएनपीए अधिकाऱ्यांचे निवासस्थान, सल्लागार कंपनीचे कार्यालय आणि अन्य खासगी संस्थांच्या ठिकाणी ही धाडसत्रे पार पडली. न्हावा शेवा येथे जलमार्ग खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या नावाखाली दोन टप्प्यांत एकूण 800 कोटी रुपयांची उचलेगिरी झाल्याचे सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात (2010-14) 365 कोटी 90 लाख, दुसऱ्या टप्प्यात (2012-19) 438 कोटी रुपये असे पैसे काम न करता फक्त कागदावर दाखवून उचलले गेले. विशेष म्हणजे, 2012 ते 2014 या काळात प्रकल्पाची देखभालच सुरू होती, तरी देखील खोदकाम झाल्याचे दाखवून कोट्यवधींची रक्कम उकळण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने खासगी कंपन्यांनी उभारलेले कटकारस्थान असल्याचे उघड झाले आहे. 2022 मध्ये सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली होती, जी आता तपासाच्या निर्णायक टप्प्यावर आली आहे.