। हैदराबाद । वृत्तसंस्था ।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत हे पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत. ही यात्रा हैदराबाद शहरात होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने अन्य राज्यातील नेतेही सामील होत आहेत.
यात्रेत सामील झाल्यानंतर नितीन राऊत यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे ते खाली पडले आणि उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, हात आणि पायालाही दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे. नितीन राऊत यांना तत्काळ उपचारासाठी हैदराबादमधील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.