कंपन्याचे दुर्लक्ष, जनतेतून संताप व्यक्त
| पाली-बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जनतेला भेडसावणार्या समस्येत आता मोबाईल नेटवर्कच्या समस्येने भर घातली आहे. ग्रामीण व शहरी भागात सतत मोबाईल नेटवर्क जाम होत असल्याने नागरीक अक्षरशः बेजार झाले आहेत. इंटरनेट व नेटवर्क यावर आजचे जग धावत आहे, प्रत्येक संगणकिय कामात इंटरनेट आवश्यक आहे, मात्र सुधागड तालुक्यात नेटवर्क समस्या गंभीर बनली आहे.
प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत नवनवीन शोध लागले असले तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात मोबाईल आहे. पण इंटरनेट व रेंज नाही अशी समस्या निर्माण झाली आहे. डिजीटल इंडियासारख्या चमकू संकल्पना केवळ जाहीरातीपुरत्या शोभून दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात इंटरनेट व नेटवर्कचा सर्वत्र बोजवारा उडाल्याची परिस्तीती आजघडीला दिसून येत आहे. आय.डी.या, वोडाफोन, एअरटेल, टाटा डोकोमो, आदी सिमला नेटवर्क (रेंज) नसल्याने नागरीकांना महत्वाच्या कामासाठी व अडीअडचणीच्या प्रसंगी तातडीने संपर्क करताना असंख्य अडचणिंना सामोरे जावे लागत आहे. आजघडीला मोबाईल ही अन्नपाण्याप्रमाणे जिवनावश्यक बाब बनली आहे. त्यामुळे मोबाईल असेल तर रेंज व इंटरनेट सुरळीत असणे अत्यंत महत्वाचे आहे.
मोबाईल नेटवर्क समस्येमुळे ब्रॉडब्रॅन्ड, लँडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सि.सी.टिव्ही सेवा बंद पडत आहे. तसेच इंटरनेटवर अवलंबून असलेली शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कामे पुर्णपणे रखडली जात आहेत. अशातच अनेक ठिकाणी बि.एस.एन.एल सेवेचा पुर्णपणे बोजवारा उडाला असून बि.एस.एन.एलचा कामकाजाचा कोलमडलेला डोलारा पाहून ही सेवा आता कालबाह्य होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सुधागड तालुक्यातील दुर्गम दुर्लक्षित भागात आजही दुरध्वनी सेवासुविधा पोहचलेली नाही. हे सर्वमान्य असले तरी आजवर शहरी व लोकवस्तीच्या भागात सुरळीत चालणारे मोबाईल नेटवर्क मागील महिनाभरापासून सतत जाम होत असल्याने हजारो मोबाईल धारकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात अनेकदा विध्दुत पुरवठा खंडीत झाला की मोबाईल नेटवर्क गायब होताना दिसते. पालीसह संपुर्ण सुधागड तालुक्यात मोबाईल नेटवर्क समस्या अधिक गंभीर झाली आहे. मात्र या समस्येकडे सबंधीत कंपन्या दुर्लक्ष करीत असल्याने नागरीक जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. सबंधीत कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क समस्या दूर करण्यासाठी आवश्यक व ठोस उपाययोजना करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.