कोट्यवधींच्या पाणी योजनेचे पितळ उघडे
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि जलशुद्धीकरण प्रकल्प सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासकीय अनास्था यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर श्रीवर्धनकरांवर पुन्हा एकदा ‘पाणीबाणी’चे संकट ओढवले आहे.
24 कोटींहून अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या या योजनेचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात झाले होते. जाहिराती, आश्वासने आणि विकासाच्या दाव्यांमुळे ही योजना चर्चेत आली होती. मात्र, उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांतच या योजनेच्या कामकाजातील त्रुटी उघड होऊ लागल्या असून, रानवली धरण ते श्रीवर्धन या मुख्य जलवाहिनीवर वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
रानवली धरण ते श्रीवर्धन मार्गावरील मुख्य जलवाहिनीवर दर दुसऱ्या दिवशी कुठे ना कुठे गळती किंवा पाईपलाईन फुटल्याच्या घटना घडत आहेत. पाईपलाईन फुटल्यानंतर तातडीच्या दुरुस्तीच्या नावाखाली रस्ते खोदले जातात, पाणीपुरवठा खंडित केला जातो आणि नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.
याहून गंभीर बाब म्हणजे, या सततच्या दुरुस्ती आणि ‘मेंटेनन्स’च्या नावाखाली नवीन बिलांचा मलिदा लाटला जात असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. कोट्यवधींची योजना पूर्ण झाल्याचा दावा होत असताना वारंवार दुरुस्तीची वेळ का येत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्याच्या परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असताना त्यासाठी वारंवार संघर्ष करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापनाचा चिखल इतका उघडपणे समोर येत आहे की, पावसाळा सुरू झाल्यानंतर नळातून स्वच्छ पाण्याऐवजी थेट चहाच यायला लागला, तरी आश्चर्य वाटायला नको, अशी संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
एकीकडे कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे दावे केले जात असताना, दुसरीकडे श्रीवर्धनकरांचे घसे कोरडे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आता तरी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का, याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे.







