| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्याच औद्योगिकीकरण झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे देश परदेशातील फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांनी आपला मोर्चा हा नवीन शेवा, भेंडखळ ग्रामपंचायत परिसरातील पाणथळ जागांवर वळविला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
फ्लेमिंगो म्हणजे ‘रोहित पक्षी’. हे पक्षी अफगाणिस्तान, इराण, इस्त्रायल मधून मोठ्या संख्येने देशातील विविध पाणथळ जागांवर हिवाळ्याच्या दिवसांत दरवर्षी येतात. त्यातील बरेचसे फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींचे पक्षी हे हजारो मीटरचा प्रवास करत नवीमुंबई व उरणच्या पाणथळ जागांवर येतात. परंतु या परिसराचा कायापालट झपाट्याने होत असल्याने पाणथळ जागांचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत जेएनपीटी बंदराच्या परिसरात मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या फ्लेमिंगोच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या उरण तालुक्यातील नवीन शेवा व भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणथळ जागांवर फ्लेमिंगो पक्ष्यांबरोबर इतर विविध जातींच्या पक्षांची रेलचेल सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत अशा फ्लेमिंगो इतर विविध जातींच्या पक्षांच्या मुक्त संचारामुळे पक्षी प्रेमींना पर्वणी ठरत आहे.