वाशीममधील वंचित मुलांवर मॅरेथॉन हृदय शस्त्रक्रिया
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या अग्रगण्य व बहु-वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय सेवा पुरवणार्या रुग्णालयाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील 11 लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया 11 तासांत कोणत्याही विकृती शिवाय आणि जीवाला धोका न होता पार पडली. 4 ते 13 वर्षे वयोगटातील या 11 मुलांना जन्मापासूनच हृदयविकार होता. या रोगावर उपचार केला नसता तर कुपोषण आणि दीर्घकालीन गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
प्रक्रियेच्या दिवशी सकाळी 7.30 वाजता डॉक्टरांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली आणि एका पाठोपाठ एक अशाप्रकारे शस्त्रक्रिया पार पाडली. 11 पैकी 5 मुलांना पेरी-मेम्ब्रेनस व्हॅस्क्युलर रोग झाला होता, हा रोग आव्हानात्मक होता तरी देखील शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडलीच. मुलांना शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिसर्या दिवशी रुग्णालयातून सोडण्यात आले. या दरम्यान कोणतीही प्रतिकूल घटना घडली नाही आणि संपूर्ण शस्त्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आता या मुलांना पहिल्या महिन्याच्या अखेरीस आणि 6 महिन्यांनंतर पाठपुरावा करण्यासाठी भेट द्यावी लागणार आहे, या व्यतिरिक्त दुसर्या कोणत्याही प्रक्रियेची आवश्यकता नाही. उर्वरित मुलांवर देखील नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे उपचार केले जाणार आहेत.
अपोलो रुग्णालयाचे बाल ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी ,सप्टेंबरमध्ये अपोलोच्या टीमने वाशिम सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. तिथे आम्ही जन्मजात हृदयविकार असल्याची शंका असलेल्या 120 मुलांची इकोकार्डिओग्राफी केली. 120 मुलांपैकी 35 मुलांना जन्मजात हृदयविकार होता. 35 पैकी 40% मुलांवर अँजिओग्राफीद्वारे उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल्सची अनुमती घेऊन मुलांना अँजिओग्राफी डिव्हाइस क्लोजरच्या प्रक्रियेसाठी नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे आणून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दिली.