। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव-पुणे रस्त्यावर मोर्बा घाटात सुर्ले गावच्या हद्दीत एसटी बस व मोटार सायकल(दुचाकी) यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सदरचा अपघात बुधवार (दि.23) दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची फिर्याद बसचालक सुभाष रामराव वाघमारे(वय-42) रा.बागन टाकली जि.नांदेड सध्या रा.श्रीवर्धन बस डेपो यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वाघमारे हे त्यांच्या ताब्यातील एसटी.बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.2915 हि गाडी श्रीवर्धन ते मुंबई अशी स्वतः चालवीत असताना अपघात ठिकाणी आल्यावर माणगाव बाजूकडून येणारी मोटारसायकल क्रमांक एम.एच.12 ए.वाय.570 या गाडीवर बसून यांतील आरोपी रुपेश विठोबा म्हस्के(वय-34) रा.मुगवली ता.माणगाव व मयत इसम मारुती धोंडू हिलम(वय-37) रा.खरवली आदिवासीवाडी ता.माणगाव हे साई येथे जात असताना समोरून एसटी बस आली असता याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल हि निष्काळजीपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून मोटारसायकल हि रोडवर खाली पडल्याने यांतील मोटारसायकलचे पाठीमागे बसलेले मयत इसम यांना डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी. भोजकर हे करीत आहेत.