जंजिरा पाहण्यासाठी शैक्षणिक सहली; राजपुरी-खोरा जेट्टीवर रांगा
| मुरूड | वार्ताहर |
गुलाबी थंडीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी शेकडो पर्यटक मुरुडमध्ये दाखल झाले असून, त्यांच्या आगमनाने येथील पर्यटन पुन्हा बहरले आहे. जंजिरा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून शैक्षणिक सहलीही येऊ लागल्या आहेत.
![](http://krushival.in/grygrars/2022/12/MURUD-1-1024x462.jpg)
रविवारी देखील जंजिरा पाहण्यासाठी राजपुरी, खोरा, दिघी बंदर जेट्टीवर प्रचंड संख्येने शालेय विद्यार्थी, पर्यटक यांची तुडुंब उपस्थिती पहायला मिळत होती. राजपुरी बंदर जेट्टीवर सकाळपासून जंजिर्यात जाण्यासाठी मोठया रांगा लागल्या होत्या. वाळूवरचे पार्किंग अपुरे पडत होते. राजपुरी ते मुरूड मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी होताना दिसत होती. राजपुरी येथून शिडाच्या बोटीने पर्यटक जंजिर्यात जाणाच्या आनंद लुटताना दिसत होते. मुरूड जवळील खोरा बंदर जेट्टीवरून यांत्रिक लाँच सेवेने पर्यटक जंजिर्यात जात होते. परंतु, येथेही पर्यटकांची तुडुंब गर्दी दिसून येत होती. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जंजिरा किल्ला पर्यटकांना पाहण्यासाठी खुला असल्याने पर्यटकांची लवकर पोहचण्यासाठी तारांबळ उडाल्याचे दिसून येत होते. राजपुरी किंवा खोरा जेट्टीवर जाण्यासाठी मुरूड बंदर, मासळी मार्केट मार्गे जावे लागते. मात्र या मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होताना दिसत होती. कित्येक दिवस हा प्रकार सुरू असून यावर तक्रार करूनही अद्याप प्रभावी उपाययोजना प्रशासनाने केलेली नाही, अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळत होती.
गोव्यापेक्षा मुरुडचे पर्यटन उत्तम
रविवारी प्रसिध्द काशीद बीचवर देखील प्रचंड संख्येने पर्यटक आलेले दिसत होते. या परिसरात सध्या खूप थंडी नाही. थंडी आणि हीट याचे संमिश्र हवामान येथे जाणवत आहे. सध्या पर्यटकांची संख्या मात्र वाढती असल्याचे दिसत असून डिसेंबर महिन्यात पर्यटन बहरत जाईल असा निष्कर्ष पर्यटन क्षेत्रातील बुजुर्ग मंडळींनी व्यक्त केला आहे. आधिक माहीती घेता कळते की, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या समुद्र किनारपट्टी भागात निसर्ग रम्य स्थळे आणि वातावरण असल्याने गोवा अथवा अन्य ठिकाणी जाण्यापेक्षा या भागात पर्यटनाला येत राहू, अशा प्रतिक्रिया रविवारी येथे आलेल्या अनेक पर्यटकांनी व्यक्त केल्या.