आदिवासींच्या घरांना धोका होण्याची भीती
सोगांव | प्रतिनिधी |
सध्या दिवसभर ढगाळ वातावरणामुळे डोंगरावर लागलेली आग दिसत नाही,याचाच फायदा अज्ञात समाजकंटकानी घेत मागील काही दिवसांपासून डोंगरावर आगी लावण्याचे सत्र सुरू केले आहे.गेल्या आठवड्यात अलिबाग तालुक्यातील प्रमुख व मोठा परिसर असणाऱ्या रामधरणेश्वर डोंगरावर अज्ञाताने आग लावली होती,ती आग पर्यावरण प्रेमी व वनरक्षक यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले,पण त्यामध्ये बराचसा भाग आगीमुळे जळून बेचिराख झाला.
मंगळवार दि.६ डिसेंबर २०२२ रोजी पुन्हा एकदा अज्ञात समाजकंटकाने आग लावुन उरलासुरळा वन परिसर नष्ट केला.या रामधरणेश्वर डोंगरावर आजूबाजूच्या गावातील हजारो गुरेढोरे मोठ्या प्रमाणात चरत असतात,या आगीमुळे चारा मात्र जळून खाक झाला आहे,परिणामी गुराढोरांची मोठ्या प्रमाणात उपासमार होऊन ती डोंगराखाली येऊन आजूबाजूच्या शेतीचे नुकसान करतात,याबद्दल शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.तसेच याठिकाणी आदिवासींची मोठ्या प्रमाणावर घरे आहेत त्यांनासुद्धा धोका निर्माण होत आहे.
बुधवारी रामधरणेश्वर डोंगरावर लागलेली आग विझविण्यासाठी सोगांव-मुनवली येथील पर्यावरण प्रेमी सचिन घाडी,अनमोल कांबळे,आदित्य गायकवाड,साकीब कुर तसेच वनरक्षक दत्ता कोळेकर,नागेश काष्टे,मंगेश धोंगडे,सुमित पाटील,प्रसाद मानकुळे यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत विशेष मेहनत घेत आदिवासींच्या घरांचे व थोड्याफार राहिलेल्या वनक्षेत्राचे होणारे नुकसान टाळले आहे.तरीही वनक्षेत्रात वनविभागाने गस्त वाढवून वनांचे संरक्षण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.