| चिपळूण । वार्ताहर ।
सह्याद्री निसर्ग मित्र आणि चिपळूण नगर परिषदेच्या सहकार्यातून सोमवार (12) भाजी मंडई शेजारी बसविलेल्या कापडी पिशवी वेंडिंग मशीनचे चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी, सह्याद्री निसर्ग मित्रचे कार्यकर्ते आणि व्यापारी उपस्थित होते.
प्लास्टिक पिशव्यांमुळे होणार्या प्रदुषणाबाबत चिपळूणकर जागरूक आहेत. प्लास्टिक पिशव्यांना पर्याय मिळाल्याशिवाय त्यांचा वापर थांबणार नाही. याचसाठी रास्त दरात कापडी पिशव्या उपलब्ध मिळवून देणारे मशीन बाजारपेठेत बसविण्यात आले आहे. केवळ पाच रुपये इतक्या कमी किमतीमध्ये चिपळूणकरांना कापडी पिशव्या मिळणार आहेत. या मशीनमुळे बाजारपेठेत सर्रास वापरल्या जाणार्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी होण्यास मदत मिळणार आहे.
चिपळूण शहर आणि परिसरात प्लास्टिक कचरामुक्तीची चळवळ आता जोर धरू लागली असून समाजातील विविध घटकांतून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे यासाठी प्लास्टिक संकलन, स्वच्छता मोहीम यासारखे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. बाजारपेठ आणि शहरातून रोज प्लास्टिक संकलन केले जात आहे. या सर्व प्लास्टिकचे वर्गीकरण करून ते रिसायकलिंगसाठी पाठवण्यात येत आहे. या सर्व उपक्रमांमध्ये भाग घेऊन नागरिकांनी कचरामुक्त चिपळूणसाठी पुढे यावे आणि प्लास्टिक पिशव्या नाकारून पिशवी वेंडिंग मशीनमधील कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन यावेळी संस्थेतर्फे करण्यात आले.