| पनवेल । वार्ताहर ।
चार-चाकी वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमाबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक चारचाकी वाहन चालक याकडे दुर्लक्ष करून नियम धाब्यावर बसवतात त्याचबरोबर आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेच्यावतीने सिटबेल्ट जनजागृती अभियान नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळ घेण्यात आले.
चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करीत असताना वाहन चालक आणि बाजूच्या सीटवरील प्रवाशाने सीट बेल्ट लावणे क्रमप्राप्त आहे. यासंदर्भात वाहतुकीचे नियम सुद्धा आहे. अशाप्रकारे सिटबेल्ट न लावणार्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस त्याचबरोबर आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल होतो. असे असतानाही काही वाहन चालक या नियमाचे पालन करीत नाहीत . सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिटबेल्ट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे अपघातात अनेकदा वाहन चालकाचा प्राण वाचतो. दुर्दैवाने रस्त्यावर दुर्घटना घडली. आणि संबंधित वाहन चालकाने सिटबेल्ट लावला असेल तर त्याच्यातून तो बचावल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरक्षितेचा दृष्टिकोनातून सिटबेल्ट अत्यंत उपयुक्त आणि उपकारक आहे.
अनेक वाहनांच्या सिटबेल्ट शिवाय अपघात कालीन परिस्थितीत एअर बॅग ओपन होत नाहीत. जर बेल्ट लावला असेल तरच त्या बाहेर येऊन फुटतात. परिणामी वाहनातील प्रवाशांचा प्राण वाचतो. या सर्व पार्श्वभूमीवर सिटबेल्ट लावूनच वाहने चालवण्याबाबत परिवहन आणि पोलीस यंत्रणेकडून वारंवार आवाहन केले जाते. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे नवी मुंबई पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त तसेच पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनानुसार सिटबेल्ट अभियान राबाविण्यात आले. यावेळी नियमांचे पालन न करणार्या वाहनचालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक जाधव , पोलिस नाईक खैरावकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल बागल, महिला पोलिस कॉन्स्टेबल जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.