सहाय्यक मत्स्य आयुक्तांचा इशारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
पावसाळ्यात दोन महिने 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारीस बंदी घालण्यात आली आहे. या 61 दिवसांच्या पावसाळी बंदी काळात संबंधित नौकांनी समुद्रात मासेमारी करू नये, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) संजय पाटील यांनी केले आहे. बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
ही बंदी केवळ यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांसाठी लागू राहणार असून, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर-यंत्रचालित नौकांना त्यातून सूट देण्यात आली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यंत्रचलित व यांत्रिक नौकांनी 1 जूनपूर्वी बंदरात परतणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 31 जुलैपर्यंत अथवा त्यापूर्वी या नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर, म्हणजे किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपुढे खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकांवर केंद्र शासनाचे स्वतंत्र धोरण व मार्गदर्शक सूचना लागू राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, पावसाळी मासेमारी बंदीचे उल्लंघन करून राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी करताना कोणतीही यंत्रचलित किंवा यांत्रिक नौका आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) 2021 च्या कलम 14 अन्वये संबंधित नौका, मासेमारी साहित्य, उपसाधने आणि मासळी जप्त करण्यात येणार आहे. तसेच कलम 17 नुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बंदी कालावधीत मासेमारी करताना अपघात झाल्यास संबंधित नौकांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच या कालावधीत राज्याच्या सागरी जलधीत मासेमारी नौकांच्या अवागमनालाही प्रतिबंध राहणार आहे. सर्व मच्छिमार सहकारी संस्था, नौकामालक, सभासद आणि संबंधितांनी या आदेशाची नोंद घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, अलिबाग कोळीवाडा, बंदर रोड, कस्टम हाऊसजवळ, अलिबाग येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक : 02141-295221.






