नगर नियोजनातील सिडकोचा नवा अध्याय
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईला पाणी पुरवठा करण्याचे आव्हान झपाट्याने शहरीकरण होण्याच्या या युगात शहरांच्या सीमा दिवसेंदिवस विस्तारत असून शहरांतील लोकसंख्या वेगाने वाढत आहेत. एकीकडे वाढती लोकसंख्या व दुसरीकडे घटणारे जलस्रोत, असे व्यस्त प्रमाण असल्याने वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नवी मुंबईही त्यास अपवाद नाही. सर्व पायाभूत सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरास राज्यातील तसेच देशातील नागरिक वास्तव्यासाठी नेहमीच प्राधान्य देत आले आहेत. यामुळे नवी मुंबई क्षेत्राची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई क्षेत्रातील नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता, पनवेल महानगरपालिका आणि सिडको अधिकार क्षेत्रातील नोड व गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोवर आहे.
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि नवी मुंबईमध्ये साकार होत असलेल्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांमुळे, नवी मुंबई क्षेत्रात पाण्याची मागणी कैक पटींनी वाढणार आहे. पाण्याची वर्तमानातील तसेच भविष्यातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. याकरिता उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर आणि नवीन जलस्रोतांची निर्मिती, ही त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. दक्षिण नवी मुंबईतील पनवेल आणि उरण तालुक्यांतील लोकसंख्या 20 लाखांपर्यंत आहे. दक्षिण नवी मुंबईतील खारघर, तळोजा, नवीन रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे आणि द्रोणागिरी या नोडमध्ये सिडकोची महागृहनिर्माण योजना तसेच विविध महत्त्वाचे प्रकल्प साकारण्यात येत आहेत. या भागातील निवासी क्षेत्रांची पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्माण योजना आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) या प्रकल्पांमुळे सन 2050 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रातील पाण्याची अंतिम मागणी 1275 दशलक्ष लीटर प्रति दिन (एमएलडी) पर्यंत असणार आहे. पाण्याची ही वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी,अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे व नवीन जलस्रोतांचे नियोजन करणे, अशी आखणी सिडकोने केली आहे.