| माथेरान | वार्ताहर |
व्हॅली क्रॉसिंग सारख्या साहसी खेळांमुळे मागील काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये पर्यटकांची संख्या वाढली होती. या व्यवसायात चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असल्याने बहुतांश पॉईंट्स वर या व्हॅली क्रॉसिंगचे जाळे पसरले असल्याचे जाणवते.
व्हॅली क्रॉसिंगचा आनंद घेताना आजूबाजूला कचराकुंड्या नसल्याने पर्यटकांकडून सुका कचरा जंगलात फेकल्यामुळे विखुरलेल्या अवस्थेत दिसत होता. जंगलाचा र्हास होऊ नये यासाठी वनखात्याने चार वर्षांपूर्वी सर्वच पॉईंट्सवरील व्हॅली क्रॉसिंगचे जाळे काढून टाकले होते. परंतु याच साहसी खेळामुळे याठिकाणी पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ देखील झाली होती. ती संख्या मागील काळात काही अंशी रोडावली होती. वनखात्याच्या जाचक अटी शिथिल झाल्यानंतरच याठिकाणी व्हॅली क्रॉसिंग या साहसी खेळाला मान्यता मिळू शकते.
माथेरानला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने 2003 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने माथेरान परिसर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जाहीर केला. पर्यावरण मंत्रालय साहसी खेळांना प्रोत्साहन देतानाच रोजगार निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी बेरोजगार तरुणांना व्हॅली क्रॉसिंगच्या व्यवसायात संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
त्यावेळेस विविध पॉईंट्स वर व्हॅली क्रॉसिंगच्या व्यवसायात ज्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम होती. अन्य व्यवसायाचे स्रोत सुध्दा असताना त्यांना सामावून घेतले होते. त्यामुळे इथला बेरोजगार युवक मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रयत्न करीत होता. या व्यवसायात मोठया प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होते. याचा अनुभव समस्त माथेरान मधील युवकांना आल्यामुळे व्हॅली क्रॉसिंग सुरू झाल्यास यामध्ये फक्त बेरोजगार युवक ज्यांच्याकडे अन्य कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नाही अशांना सामावून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर बेरोजगार युवकांच्या रोजगारावर कुठल्याही प्रकारची गदा येऊ नये यासाठी राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये अन्यथा स्वबळावर योग्य त्याठिकाणी आम्ही स्वतःचे रोप लावून व्हॅली क्रॉसिंगचा व्यवसाय सुरु करू, असेही बेरोजगार युवकांमधून सूर निघत आहेत.