| महाड | प्रतिनिधी |
सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडा त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या महाड मधील लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे 11 ते 19 जानेवारी पर्यंत महाड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव नवे नगर येथील स्व. माणिकराव जगताप क्रीडा नगरीमध्ये होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक व लोकविकास सामाजिक संस्थेचे हनुमंत जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
लोकविकास सामाजिक संस्थेतर्फे 2016 पासून महाड महोत्सव साजरा करीत असून मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव व महापुरामुळे या महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. यावर्षी हा महोत्सव भव्य स्वरूपामध्ये साजरा करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष संदीप जाधव माजी नगरसेवक प्रमोद महाडिक सामाजिक कार्यकर्ते सुदेश कलमकर धनंजय देशमुख रंगसुगंधचे अध्यक्ष सुधीर शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
बुधवार 11 जानेवारी रोजी महोत्सवाचे उद्घाटन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप कामत, अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या चेअरमन श्रीमती शोभाताई सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची माहिती सांगताना सलग नऊ दिवस हा महोत्सव होणार आहे. या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून करमणूक, खेळ यांच्या देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विविध वस्तूंचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहे.
12 जानेवारी रोजी आर्केस्ट्रा त्यानंतर विविध कलाकारांचा कार्यक्रम शुक्रवारी मुंबईतील नामवंत कलाकारांच्या कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दिनांक 15 रोजी बाल नृत्य कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर जादूचे प्रयोग करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दि. 18 रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती महोत्सवामध्ये असणार आहे. 19 जानेवारी रोजी महोत्सवाची सांगता करण्यात येणार असून या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील त्याचबरोबर झेप फाउंडेशनच्या चित्रलेखा पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सुधीर शेठ यांनी दिली.
महाड मधील नवे नगर परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाड महोत्सवाला अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.