| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत बाबू शिंदे यांनी यावर्षीही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंबा पेटी बाजारात पाठवली असून सलग नऊ वर्षे ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात पाठवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांना पेटीला वीस हजार रुपये दर मिळाला आहे. त्यांनी एक आंबा पेटी अहमदाबाद येथे तर दुसरी मुंबई वाशी मार्केटला पाठविली होती. त्याला चांगला दर मिळाल्याने आता टप्प्या टप्प्याने हापूस आंब्याच्या पेट्या पाठवल्या जाणार आहेत.
पूर्वी आंब्या पेटीचा मुहूर्त हा गुढीपाडव्याला होत असे. त्यामुळे एप्रिल-मे मध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. मे 15 नंतर खर्या अर्थाने सर्वसामान्य ग्राहकांना आंबा खाण्यास मिळत असे. सुरवातीच्या जादा दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंबा खाणे कठीण होते, परंतु सध्या सातत्याने होत असलेली आंबा फवारणी, त्यासाठी घेतली जाणारी मेहनत आणि आंब्याला पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे सध्या आंब्याला मोहर लवकर येतो. सुरवातीला होणार्या आंबा पिकाला चांगला दर मिळतो.
गणेशगुळे येथील वयोवृद्ध आंबा बागातदार शशिकांत शिंदे हे गेली अनेक वर्ष आंबा बागेमध्ये लागवड केल्यानंतर त्याची व्यवस्थितरित्या बागांचे योग्य नियोजन करून त्या झाडांना आवश्यक असणार्या सर्व गोष्टीची वेळापत्रकानुसार खतपाणी फवारणी करीत असल्यामुळे बागेतील सर्व झाडे त्यांना अपेक्षित उत्पन्न देतात. गेली नऊ वर्ष जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्यांचा आंबा बाजारात जात आहे, त्याला दर चांगला मिळतो.
शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी ज्याप्रमाणे माझ्या शरीराची योग्य रितीने काळजी घेतो. त्यामुळे माझे शरीर चांगल्या तर्हेने मला साथ देत आहे. त्याप्रमाणे प्रत्येक आंबा कलमाला लागवड केल्यापासून त्याला लागणारे पाणी, खत, वेळोवेळी लागणार्या फवारण्या याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यामुळे ही झाडे मी केलेला कष्टाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे त्या माध्यमातून पीक चांगल्या प्रकारे येते. त्यामुळे फळांची निवड करताना परिपक्व झालेली फळे काढणीच्या वेळी लक्ष ठेवून काढतो. त्यामुळे दरही चांगला मिळतो. गेली नऊ वर्ष जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आंबा ग्राहकांच्या भेटीला जातो. त्याचबरोबर या परिसरामध्ये आंबा बागेतील कलमांना पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळेच उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळते. यासाठी आजही झाडांची निगा राखण्यासाठी झटत असल्याचे त्यांनी सांगितले.