क्षितिजाला सुवर्ण, तर सईला रौप्यपदक
| खोपोली । प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य- पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने खोपोली येथील नियोजित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी येथे मोठ्या दिमाखात करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर असे आठ विभाग आणि एक क्रीडा प्रबोधिनी मिळून 161 अव्वल महिला कुस्तीगीरांनी आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले.
या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई विभागाची खेळाडू आणि कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी क्षितिजा जगदिश मरागजे ही 14 वर्ष वयोगट आणि 39 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. या यशामुळे क्षितिजाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर, मुंबई विभागाची सई संजय शिर्के हिने 17 वर्ष वयोगटात 40 किलोगटात रौप्यपदक प्राप्त केले आहे.
क्षितिजा आणि सई यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक आ. महेंद्र थोरवे, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, केटीएसपीचे अध्यक्ष संतोष जंगम, किशोर पाटील, मारुती आडकर, शशी भूषण, भावेश रावल, महेश राठी, डॉ. रणजित मोहिते, पांडुरंग साळुंखे, विठ्ठल मोरे, एम.डी.चाळके, बळीराम शिंदे, जितेंद्र सकपाळ, उमेश कदम, दत्तात्रय सकपाळ, विक्रम पाटील, गुरुनाथ साठेलकर, निर्मल मारिया, लिली पॉल, समीर शिंदे, जयश्री नेमाने आणि सर्व शिक्षक यांच्याकडून होत आहे.
क्षितिजा आणि सई हिला राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, राजाराम कुंभार यांचे मार्गदर्शन लाभलेे, तसेच त्यांचा सराव विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओंकार निंबळे, जयेश खरमारे, पायल मरागजे यांनी घेतला.