इंदापूरात रेल्वेप्रवासी संख्या रोडावली, स्थानकात एकाच गाडीला थांबा
| माणगाव । वार्ताहर ।
गतिमान प्रवासासाठी कोकण रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत कोकण रेल्वे ट्रॅकवरून दुपदरीकरणामुळे कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गतिमान झाला. गोवा, मुंबई, कोकण प्रवास करणार्या पर्यटक प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने मोठी भरारी घेतली आहे. सन 2017 मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी इंदापूर येथे कोकण रेल्वे क्रॉसिंग स्टेशनचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी त्यांनी या मार्गावरील देशातील रेल्वे मार्ग गतिमान करण्याबरोबरच कोकण मार्गही प्राधान्याने गतिमान करीत या मार्गांनी ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याबरोबरच अतिजलद गाड्याही या मार्गाने धावतील. त्यामुळे कोकणातील पर्यटनाला अधिक चालना मिळेल. या मार्गावरील अतिजलद गाडया सुरू करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे अधुनिकिरण करण्याची गरज आहे, असे सांगितले होते. त्यानंतर इंदापूरसह अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण केले.
मात्र इंदापूर येथे रेल्वे स्टेशनकडे रेल्वे ट्रॅक ओलांडून प्रवाशांना जीव मुठीत धरून जावे लागते. या स्टेशनवर पूर्वी अनेक गाड्यांना थांबा होता. आता या आधुनिकीकरणात एकच रेल्वे गाडी थांबत आहे. त्यामुळे हे स्टेशन फक्त क्रॉसिंग स्टेशन बनले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास प्रवाशांना दुर्मिळ झाला असून प्रवाशांनी इंदापूर रेल्वे स्टेशनकडे पाठ फिरवली असून या अत्याधुनिकीकरणात प्रशासनाने आपले प्रवासीच हरवले आहेत.
दिवा-सावंतवाडी-मडगाव व मडगाव-सावंतवाडी-दिवा हि कोकण रेल्वे 1 नोव्हेंबर 2021 रोजी पासून बंद आहे. इंदापूर रेल्वे स्थानकात सकाळी 10.00 रत्नागिरी-दिवा हि गाडी थांबते. तर दिवा- रत्नागिरी जाणारी हि रल्वे सायंकाळी 6.00 वाजता रेल्वे स्थानकावर थांबते. मात्र या व्यतिरिक्त एकही रल्वे गाडीला थांबा नाही. त्यामुळे हे स्थानक क्रॉसिंग पुरतेच मर्यादित राहिले आहे. या विविध समस्यांमुळे इंदापूर रेल्वे स्थानक नावापुरतेच उरले असून रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालवले आहे.