। खोपोली । संतोषी म्हात्रे ।
मुंबई -पुणे महामार्गावरील खोपोली शीळफाटा येथील उतार अपघातांचे केंद्र बनले आहे. मागील एक महिन्यात या ठिकाणी चार भीषण अपघात घडले. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे बाजूकडून येणारा मालवाहतूक ट्रक अनियंत्रित होऊन उलटला व भीषण अपघात घडला.
यात ट्रक चालक व एक पादचारी असा दोघांचा मृत्यू झाला आहे. ट्रक काही अंतरावर उभे असलेल्या 18 ते 20 कामगारांच्या समूहापासून थोड्याच अंतरावर उलटला नाहीतर फार मोठी जीवितहानी व भयंकर परिस्थिती या अपघाताने निर्माण झाली असती.
या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाट मार्गे पुणे बाजूकडून माल वाहतूक ट्रक एमएच 46 जीएफ 0381 शीळफाटा येथील उतारावरून येत असताना, रायगड बाजारजवळ हा ट्रक अनियंत्रित झाला व रस्त्या लगत उभ्या असलेल्या क्रेनला धडकून उलटला. यामध्ये पादचारी धोंडू लक्ष्मण सावंत (वय 60, रा .नंदनपाडा-डोणवत) यांचा ट्रकखाली जाऊन जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक मोहम्मद परवेज शहाबुद्दीन (वय 25, रा. बिहार) गंभीर जखमी झाला होता. मात्र एमजीएम रुग्णालयात नेत असतांना त्याचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, खोपोली पोलीस व अपघातातग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपच्या सदस्यांनी मदतकार्य केले. गंभीर जखमी असलेल्या चालकास बाहेर काढून एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. अडकलेल्या मयत व्यक्तीला बाहेर काढून, उलटलेला ट्रक सरळ करून रस्त्याच्या बाजूला नेण्यात आला व येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
विशेष बाब म्हणजे मागील एक महिन्यात याच अंतरात एकूण चार भीषण अपघात घडले असून, यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. हा उतार अपघातांचे केंद्र बनले आहे. संबंधित व्यवस्थेकडून अपघात रोखण्यासाठी तातडीने योग्य उपाययोजना होण्याची गरज निर्माण झाली आहे.