वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप
| कर्जत | प्रतिनिधी |
राज्यात महाकुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठी वृक्षतोड करण्यात आली होती, या वृक्षतोडीवरुन नाशिकमध्ये नागरिकांनी आणि पर्यावरणप्रेमींना तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यातच आता, भिमाशंकरच्या डोंगररांगातील कर्जतच्या साय डोंगररागेत असलेल्या वृक्षांची तोड केली जात आहे. यावरुन, पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची राख करून कर्जतमधील 32 हजार झाडे तोडली जाणार आहेत. आतापर्यंत हजारो भल्यामोठ्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने संतापाचा उद्रेक झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी साय डोंगरातील वृक्षतोडीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केल.
गुजराती टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाला पक्षपातीपणा दाखवल्याचा आरोप महायुती सरकारवर होत आहे. या प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील अंदाजे 3 लाख झाडे तोडली जातील, असा दावा स्थानिकांकडून होत आहे. भीमाशंकरच्या जंगलातील या वृक्षतोडीवरुन राजकीय वातावरणही तापलं असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कर्जत येथे जंगलतोड होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. तसेच, “मरण आले तरी चालेल, पण हा लढा आता थांबणार नाही,” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे.
ते म्हणाले की, तुम्ही मेगावॅट मेगावॅट म्हणताय पण तुम्ही, येथे मेगा वाट लावत आहात. कंपनी कुठली, तर गुजरातची. दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता येथे वृक्षतोड करून येथे सुद्धा फडणवीस दुष्काळ जाहीर करतील, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी कर्जतमधील साय डोंगर प्रदेशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. भाजपच्या मालक असलेल्या कंपन्यांनाना हे काम दिले जात आहे, तुम्हाला चेक सुद्धा दिले जातील. ते आमदार, खासदारांना खरेदी करतात तर तुमचे काय? भकास करून विकास होणार नाही. मुख्यमंत्री पारदर्शक तुमचा आवडता शब्द, आता पारदर्शकपणे सांगा सुनावणी घेतली होती की नाही? आणि पर्याय कुठले नेमले होते? सुनावणीमध्ये हरकती घेतल्या त्याचं काय? असे अनेक सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.
आमच्या महाराष्ट्राची जमीन विकू देणार नाही, मरण आला तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी पर्यावरण रक्षणासाठी आणि जंगलतोडीसाठी आपला तीव्र विरोध असल्याचे दाखवून दिले. तुमचा अभिनंदन तुम्ही वृक्षतोड थांबवली, तुम्ही सुद्धा इथे चिपको आंदोलन करा. जे कट्टर येतील ते तोडा, फेका. आपल्या जंगलाला हात लावू द्यायचा नाही, असे म्हणत स्थानिकांचे कौतुक करत त्यांना हे आंदोलन तीव्र करण्याचेही आदित्य ठाकरे यांनी सूचवले आहे.







