| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रेवदंडानजिक साळाव पूल कमकुवत झाल्याने त्यावरील अवजड वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अलिबाग -पेण मार्गावरील जे पूल, मोर्या आहेत त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे, अशी मागणी शेकाप नेते पंडित पाटील यांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यात गेल, जेएसडब्ल्यू, आरसीएफ सारखे मोठे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांसाठी साहित्यांची, कामगारांची वाहतूक करण्यासाठी दररोज शेकडो अवजड वाहने अलिबाग तालुक्यातील पुलांवरुन धावत असतात. त्यामुळे तीनविरा, पेझारी आदी ठिकाणी असलेले छोटे पूल वाहतुकीस कमकुवत ठरत आहेत. यासाठी या पुलांचेही ऑडिट करुन त्याची गरज असल्यास तातडीने देखभाल, दुरुस्ती करावी, अशी मागणीही पंडित पाटील यानी केली आहे.
या छोट्या पूल, मोर्यावरुन दररोज हजारो टन साहित्य घेऊन अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे या पुलांचे आयुष्यही घटलेले आहे, याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या अवजड वाहतुकीसाठी नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणीही पंडित पाटील यांनी केली आहे.