दुसरा डोस घेऊन 14 दिवसाची अट
। मुंबई । वृत्तसंस्था ।
येत्या 15 ऑगस्टपासून दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी पास देण्यात येणार असून पासधारकांनाच प्रवास करता येणार आहे. एकीकडे मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्याची मुभा मिळाल्यामुळे दिलासा मिळाल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना त्यातल्या अटींमुळे आणि लसीकरणाच्या आकडेवारीमुळे मुळात लाखो प्रवासी लोकल प्रवासापासून वंचितच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या कमीच असल्यामुळे या परवानगीचा लाभ देखील तुलनेनं कमी प्रवाशांना मिळणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याची अट घालण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन डोस झाल्यानंतर देखील फक्त महिन्याचा पास घेतलेल्या व्यक्तींनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे तिकीट न घेता अशा पात्र प्रवाशांना थेट महिन्याचा पासच काढावा लागणार आहे. या अशा नियमावलीमुळे लाखो मुंबईकर आणि आसपासच्या ठिकाणाहून मुंबईत ये-जा करणार्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी मिळूनही प्रवासापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आत्तापर्यंत फक्त 16 लाख 44 हजार 840 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यापैकी 14 लाख 81 हजार 195 नागरिक हे 45 वर्षांपुढील आहेत. त्यामुळे लोकलमधून सर्वाधिक प्रवास करणार्या 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची संख्या अवघी दीड लाखांच्या घरात जाते. त्यातही फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांचीच संख्या अधिक असल्यामुळे सुरुवातीला अवघ्या काही हजार मुंबईकरांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.