कायमस्वरुपी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ नियुक्त
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय महिला संघास हंगामी स्वरूपात प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्याची पद्धत रद्द करून आता प्रदीर्घ कालावधीसाठी या नियुक्त्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ करणार आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार मुख्य प्रशिक्षक क्रिकेट सल्लागार समितीने; तर निवड समिती सपोर्ट स्टाफची निवड करायची असते, परंतु हा नियम महिला क्रिकेटमध्ये गेली अनेक वर्षे पाळला जात नव्हता. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी प्रशिक्षक तसेच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील प्रशिक्षकांची नियुक्ती हंगामी स्वरूपातच होत होती.
महिला क्रिकेटमध्ये प्रशिक्षकांच्या नियुक्त्या आता हंगामी स्वरूपातील नसतील. संघाला स्थैर्य देण्यासाठी या नियुक्त्या प्रदीर्घ कालावधीच्या असतील, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली. बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या डिसेंबर महिन्यात महिलांच्या मुख्य प्रशिक्षक पदावरून रमेश पोवार यांना दूर करण्यात आल्यानंतर महिला संघासाठी मुख्य प्रशिक्षक नव्हता. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला संघ मुख्य प्रशिक्षकांविनाच खेळला होता.
फलंदाजीचे प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे हंगामी स्वरूपाची जबाबदारी देण्यात आली होती. सिनियर महिला संघाला अजून कोणतेच विश्वअजिंक्यपद मिळालेले नाही. पुढच्या आयसीसी स्पर्धांसाठी प्रदीर्घ काळासाठी प्रशिक्षक नेमणे ही पहिली पायरी ठरू शकेल, असे सांगण्यात येत आहे.