| गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील बाहे गावाचे 1989 च्या पुरानंतर पुनर्वसन झाले. परंतु याला 33 वर्षे होऊन गेल्यानंतरही या गावाला अद्यापही स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने जनता पूर्णपणे त्रस्त असून या अतिमहत्वाच्या समस्याकडे शासनाचे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे.
भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पुर्ण झाल्यावर शासनाच्या वतीने मोठया थाटात अमृतमहोत्सव साजरा केला व विकासाच्या नावावर जिवनमान उंचविण्याच्या घोषणा केल्या गेल्या. देशात लोकशाहीचे राज्य येऊन इतकी वर्षे झाली, बाहे गावाला आद्यपही अंत्यसंस्काराची हक्काची स्मशानभूमी नाही ही प्रशासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.
गावातील मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर पाटबंधारे खात्याच्या कालव्याच्या बाजूला बांबू किंवा लाकडे उभे करुन त्यावर लाकडे रचून अंत्यसंस्कार केले जातात. तेथे कोणतीही स्मशानभूमी व स्मशानशेड नसल्यामुळे उन्हात उभे राहून अंत्यसंस्कार केले जात आहे. याची चौकशी केली असता शासनाने कोणतीही जागा उपलब्ध करून न दिल्यामुळे स्मशानभूमी व स्मशान शेड बांधली नसल्याचे समजते. स्मशानभूमी नसल्यामुळे होणार्या गैरसोयीबद्दल गावकर्यांनी वेळोवेळी शासनाकडे या समस्याबद्दल लेखी निवेदन देऊनही स्मशानभूमी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या पावसाळ्यात एक मृत व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले असता बाजूला असलेल्या नदीला पुर आला. पुराचे पाणी स्मशानभूमीसाठी उभ्या केलेल्या बांबू जवळ आल्यामुळे प्रेत उचलून पत्र्यावर ठेवून मोठया मेहनतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यामुळे एखाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा व त्याची होणारी विटंबना थांबवावी यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून स्मशानभूमी प्रशासनाने बांधून द्यावी, अशी जनभावना लोकांची आहे.