। अलिबाग । प्रमोद जाधव ।
खारघर येथील दुर्घटनेनंतर थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 17 एप्रिल रोजी सद्भावना पत्रक प्रसिध्द करून प्रतिक्रीया व्यक्त केली होती. परंतू धर्माधिकारी यांची बदनामी व्हावी, त्यांच्या अनुयायींमध्ये राज्य शासनाबाबत शत्रुत्वाची, द्वेषाची भावना निर्माण करण्याचा खोडसाळपणा अज्ञाताने केला. सरकारविरोधात उठाव होईल, असा उद्देश ठेवून खोटे पत्रक तयार केले होते. हे पत्रक सोशल मिडीयासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिध्द केले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानूसार शुभम काळे या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती.
शुभम राजेंद्र काळे (वय 24) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण पुणे जिल्ह्यातील खडकी येथील मुळ रहिवासी आहे. सध्या तो पुणे जिल्हयातील स्वारगेट येथील गुुरुवार पेठ येथे राहतो. हा तरुण त्याची आजी हिराबाई काळे यांच्यासोबत खडकी येथे राहत आहे. तर त्याची आई पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथील मदनवाडी येथे त्याच्या मामाकडे राहते.
शुभमचे शिक्षण 2019 मध्ये बी.कॉमपर्यंत झाले असून सध्या तो पुण्यातील हितेन गुजराती यांच्या हितेन गुजराती अँन्ड असोसिएट्स या कार्यालयात सी.एसचे शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षापासून तो संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कार्यरत आहे. त्यामुळे तो बर्याच कार्यकर्त्यांना ओळखतो. त्यामध्ये सुमारे चार वर्षापासून संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काठे यांना ओळखत असल्याचेही त्यांनी पोलीस तपासात सांगितले.
शुभमला सशर्त जामीन
आप्पासाहेब धर्माधिकारी यांची बदनामी करण्याबरोबरच सरकारविरोधात उठाव होईल असा उद्देश ठेवून तयार केलेले खोटे पत्रक सोशल मिडीयामार्फत व्हायरल करणार्या पुणे येथील तरुणाला एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याचा जामीन एक दिवस पुढे ढकल्याने बुधवारी त्याचा सशर्त जामीन मंजुर करण्यात आला.
शुभमने म्हटलं हो मग ठरलं!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे हा तपास सोपविण्यात आला होता. सायबर गुन्हे शाखा व अन्य माध्यमांद्वारे अज्ञाताचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये शुभम काळे या तरुणाला पुण्यातून संशयीत म्हणून ताब्यात घेतले. परंतू त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने त्याला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. शुभम काळे या तरुणाने सोशल मिडीयावर आलेल्या पत्रावर हो मग ठरलं असे कॉमेंट दिले होते. त्यामुळे त्याला आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले होते.