खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत, तत्काळ दुरुस्तीची नागरिकांची मागणी
| रसायनी | वार्ताहर |
दांड-पेण रसायनी रेल्वे स्थानकमार्गे जुन्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना कसरत होत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी टाकेदेवी तीन आसनी रिक्षाचालक-मालक संघटना यांनी आणि नागरिकांनी केली आहे. या वेळी रिक्षा संघटनेने आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
रसायनी फाटा ते गुळसुंदे या दीड-दोन किलोमीटर जुन्या रस्त्यावरून पाताळगंगा परिसरातील गावांतील वाहनांची रसायनी रेल्वे स्थानक आणि नवीन पोसरी, पोसरी आदिवासीवाडी, तुराडे, कष्टकरी नगर, तुराडे आदिवासी वाडी आदी ठिकाणी रहदारी असते. तसेच पेण, अलिबागकडे एसटी बस आणि इतर वाहनांचीही वर्दळ सुरू असते. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असूनही रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी वाहनचालकांची तक्रार आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रसायनीतील दांड फाटा ते आपटे फाटा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाणी तुंबून ज्या ठिकाणी रस्ता पाण्याखाली जातो, तेथे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रसायनी रेल्वे स्थानकमार्ग रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू आहेत.
धनाजी टिळे,
अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल