जिल्ह्यातील 14 तालुक्यांत होणार मोफत उपचार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्याच्या 14 तालुक्यांमध्ये सोमवारी (दि.1) अर्थात महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलीकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेष तज्ञ संदर्भ सेवा पुरविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरु होणार्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणार्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. किरण पाटील व डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील दवाखान्यांचे ठिकाण
- सावित्री पर्ल्स बिल्डिंग, ब्राह्मण आळी अलिबाग.
- दहिवली, नगरपरिषद कर्जत.
- भानवाज बालवाडी, खोपोली,
- जुनी भाजी मंडई, चवदार तळ्याजवळ, महाड.
- जुने माणगाव, नगरपंचायत माणगाव.
- साबर बौद्धवाडी जवळ, बस स्टँड, नगरपंचायत म्हसळा.
- दुकान नं. 27, मुरुड, नगर परिषद मुरुड.
- खारघर सेक्टर 12, पनवेल महानगरपालिका.
- म्हाडा कॉलनी, नगर परिषद पेण.
- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह नगरपंचायत पोलादपूर.
- अष्टमी, रोहा नगर परिषद रोहा.
- जीवना कोळीवाडा, नगर परिषद श्रीवर्धन.
- तळा मंदाड रोड, रोड बिल्डिंग, एटी पोस्ट, तळा.
- कोटनाका, नगर परिषद उरण.