शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्या आल्या की मुंबई व पुण्यातून गाड्या बाहेर धावू लागतात. कोकणातले समुद्रकिनारे, मावळातले डोंगर, लोणावळा, माथेरान, महाबळेश्वरसारखी थंड हवेची ठिकाणे किंवा वेगवेगळी देवस्थाने यांच्या दिशेने जाणार्यांची एकच गर्दी होते. सुट्टी संपली की पुन्हा उलट्या दिशेने हेच घडते. गेल्या शनिवारी आणि नंतर सोमवारी पुणे-मुंबई, मुंबई-गोवा आणि मुंबई-नाशिक या सर्व मार्गांवर जागोजाग वाहनांची गर्दी किंवा कोंडी दिसत होती. रायगडात बहुदा दर शनिवारीच अलिबाग, मुरुड, श्रीवर्धनच्या दिशेने येणार्यांची कमी-अधिक झुंबड पाहायला मिळते. शेतकर्यांना कर्ज मिळण्यासाठी मगजमारी करावी लागते. कारसाठी मात्र हसत हसत कर्ज मिळते. त्याचा व्याजदरही डोईजड नसतो. त्यामुळे लोकांकडच्या मोटारींची संख्या विक्रमी वेगाने वाढत चालली आहे. देशात एकट्या एप्रिल महिन्यात देशभरात तीन लाख 31 हजार गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत तेरा टक्क्यांनी वाढ झाली. ही केवळ नवीन गाड्यांची विक्री झाली. जुन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा यात समावेश नाही. देशात सध्या एकूण सुमारे 33 कोटी वाहने आहेत. 2008 मध्ये ही संख्या सुमारे दहा कोटी होती. म्हणजेच, गेल्या अवघ्या पंधरा वर्षात ती तिपटीहून अधिक झाली आहे. हा वेग भयंकर आहे. या वाहनांसाठी अर्थातच मोठे व उत्तम रस्ते लागतील. ते आपल्याकडे नाहीत. ज्या गतीने वाहने वाढत आहेत त्यांना पुरे पडतील अशा वेगाने रस्ते बांधणे हे आपल्यालाच नव्हे तर प्रगत देशांनाही कठीण आहे. यामुळे एरवी रोजच्या रोज शहरांमध्ये आणि सुट्टीच्या दिवशी शहराबाहेर जाणार्या रस्त्यांवर भीषण वाहतूक कोंडी होणे हे नित्याचे झाले आहे. अर्थातच हे केवळ मुंबई-पुण्यातच घडते असे नव्हे. बंगलोर, हैदराबाद, दिल्ली या शहरांमध्येही अशाच किंवा याहून वाईट कोंडीला लोक सामोरे जात असतात. जगभरातल्या तमाम सर्वश्रेष्ठ आयटी वा वित्त कंपन्या गेल्या काही वर्षात बंगलोरमध्ये मुक्कामाला आल्या आहेत. पण तेच बंगलोर हे वाहतूक कोंडीसाठीही जगामध्ये कुविख्यात झाले आहे.
मोडलेल्या व्यवस्था
आपल्याकडचा मुंबई-पुण्यादरम्यानचा पट्टा गेल्या पंचवीस वर्षांमध्ये झपाट्याने विकसित पावला आहे. एक्स्प्रेस वेमुळे या दोन्ही शहरांमधले अंतर दोन तासांवर आले आहे. आज बोरीबंदरहून कर्जत, खोपोली किंवा कसारा इथं जाण्यासाठी लोकल ट्रेनने जितका वेळ लागतो तितकाच कारनेही बोरीबंदरहून फ्रीवेमार्गे पुण्याच्या आयटी क्षेत्रात म्हणजे हिंजवडीला वगैरे पोचायला लागतो. एकीकडे हा वेग वाढत असताना पुणे व मुंबई शहरातले अंतर्गत रस्ते मात्र कमालीचे मागास, अरुंद, अपुरे, भरपूर खड्डे असलेले असे आहेत. या दोन मुख्य शहरांची ही स्थिती. तर त्याच्या आजूबाजूने वाढणार्या परिसराची स्थिती किती वाईट असेल याची कल्पना कोणीही करू शकेल. त्यामुळेच पुण्यानजीक मावळातले रस्ते किंवा मुंबईलगतचे उरण, अलिबाग, मुरुड, खोपोली, पाली, कर्जत इत्यादी भागातले रस्ते हे अतिशय वाईट स्थितीत आहेत. अलिबागला मुंबई-पुण्याशी जोडण्यासाठी कळीचा असलेल्या अलिबाग-वडखळ रस्त्याची दुरवस्था सर्वांना ठाऊक आहे. पावसाळ्यात या रस्त्याला प्रचंड खड्डे पडतात. शिवाय, जेमतेम दोन वाहने ये-जा करू शकतील असा हा रस्ता पर्यटकांच्या वाढच्या संख्येला पुरा पडू शकत नाही हे वारंवार दिसले आहे. याच नव्हे तर इतरही भागाचा वेडावाकडा होत गेलेला आहे. नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली यांचा परिसर किंवा तिथल्या औद्योगिक क्षेत्रांच्या लगतचे रस्ते, इमारती, वसाहती खरजेसारख्या भयानक रीतीने वाढलेल्या आहेत. त्यातच रोजच्या रोज लोकांकडच्या वाहनांची संख्याही वाढते आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे भयानक त्रास, प्रचंड मनस्ताप आणि भीषण प्रदूषण. गेल्या शतकात शहरीकरण होणे म्हणजे लोकांच्या सुखसोयी वाढणे, प्रवासाची साधने वाढणे आणि एकूणच जीवनमान उंचावणे असे समीकरण होते. पण आता ते पूर्ण बदलले आहे. नियोजनाच्या अभावामुळे आपल्या शहरांच्या व्यवस्था मोडून पडत आहेत. रस्त्यांवरची गर्दी, कोंडी आणि रांगा या त्याचेच निदर्शक आहेत.
वेळीच सावध व्हा
आपली सरकारे व अधिकारी या सर्वांबाबत तात्पुरत्या मलमपट्ट्या शोधून काढत असतात. रस्ते अपुरे पडले तर त्यांच्यावर उड्डाणपूल बांधा हा मार्ग 1990 च्या दशकात लोकप्रिय होता. मुंबईत असे 55 उड्डाणपूल बांधण्यात आले. आता तर या रस्त्यांवरही आणखी वर मेट्रोचे बांधकाम करण्यात आले आहे. इतके करूनही मुंबईतले वाहतुकीचे आजार वाढतच चालले आहेत. आता एकविसाव्या शतकात जमिनीच्या पोटातून भुयारी मार्ग काढण्याची टूम निघाली आहे. बोरीवली ते ठाणे यांच्यादरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून असा भुयारी मार्ग करण्याचे सध्या घाटते आहे. पुण्यातही अनेक उड्डाणपूल बांधण्यात आले. स्वारगेटजवळचा एक पूल तर अवघ्या पाच वर्षात चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आल्याचे लक्षात आल्याने पाडावा लागला. आता तेथे मेट्रो सुरू झाली आहे. पण पुणेकर तिच्यातून प्रवास करण्याऐवजी रस्त्यावरून गाड्या घेऊन जाणेच पसंत करतात. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवरची गर्दी आहे तशीच आहे. तिथली मेट्रो इतकी रिकामी धावते की तिच्यात वाढदिवस, बारशी, स्नेहसंमेलनं असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निमंत्रण मध्यंतरी जाहीररीत्या देण्यात आले होते. मुंबई-पुण्यातले हेच तात्पुरते वा घायकुती प्रकारचे नियोजन नवी मुंबई ते रायगड सर्वत्र पाहायला मिळत आहे व पुढेही मिळणार आहे. आणखी पाच-दहा वर्षांनी लोकसंख्या व वाहने जसजशी वाढतील तशी या सर्वच भागांमधील स्थिती भयंकर बकाल होणार आहे. दुर्दैवाने सामान्य जनतेला याचा विचार करण्याइतका अवसर नाही. एक तर ते सर्व जण पोटाच्या मागे लागले आहेत किंवा मग मोबाईलवर गेम खेळण्यात किंवा रील्स पाहण्यात बिझी आहेत. आपले नोकरशहा किंवा नियोजनकर्ते तर इतक्या दूरचा विचार कधीच करत नाहीत. खासगी बिल्डर इत्यादी मंडळींचा जीवही केवळ त्यांच्या सध्याच्या प्रोजेक्ट्समध्ये अडकलेला आहे. या सर्वांनी जागे होण्याची हीच वेळ आहे. अन्यथा, उद्या घराचा उंबरा ओलांडण्याच्या आधीच त्यांना तुम्ही रांगेत आहात हे वाक्य ऐकू येऊ लागेल.