| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील तळा-इंदापूर रस्त्यावर चिंचेजवळील मोहल्ल्याच्या खालच्या भागात असलेला दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 52 हजार 550 रूपये किंमतीचे साहित्य व रोख रक्कम चोरून दुकानफोडी केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की बुधवार (दि.3) रोजी रात्री दोन ते सकाळी 8.30 वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी आसीफ जलील फटाकरे यांचे आफताब जनरल स्टोअर्सच्या वरील सिमेंटच्या पत्र्याचे नट कोणत्यातरी हत्याराने काढून पत्राउचलून त्यावाटे दुकानात आत जाऊन 12 हजार 550 रुपये किंमतीच्या डेरिमिल्क कॅडबरी चॉकलेट व 40 हजार रूपये रोख गल्ल्यात असलेली रक्कम चोरली. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक व फिंगरप्रिंटद्वारे तपास केला. मात्र चोराचा कोणत्याच प्रकारे थांगपत्ता लागला नसल्याने चोराला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. याबाबत तळा पोलीस ठाणे येथे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.