गावातील परिसर गलिच्छ, ग्रामस्थांची कारवाईची मागणी,
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतमधील स्मशानभूमीचा परिसर सध्या दुर्गंधीयुक्त बनला आहे. नेरळ बाजारपेठेत व्यवसाय करणारे चिकन विक्रेते यांच्याकडून सडलेल्या कोंबड्या आणि शिल्लक मांस हे तेथे स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतकडून या चिकन विक्रेते यांच्यावर कधी कारवाई होणार? हा प्रश्न असून सडलेले मांस टाकणार्यावर कारवाइची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नेरळ ग्रामपंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम समजली जाते. त्यात माथेरान या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून माथेरानची ओळख आहे. त्यामुळे नेरळमध्ये असलेली बाजारपेठ गर्दीने फुललेली असते. त्यात त्या बाजारपेठेत व्यवसाय करणारे व्यवसायिक यांच्यात मच्छी आणि चिकन तसेच मटण विक्रेते देखील आहेत. त्यापैकी चिकन विक्री करणार्या व्यवसायिक यांच्याकडून नेरळ गावातील चांगला परिसर गलिच्छ होत आहे.
गावातील बाजारपेठ भागात आणि अन्य ठिकाणी चिकन मांस विकणार्या व्यवसायिक यांच्याकडून संध्याकाळी सडलेल्या कोंबड्या, शिल्लक राहिलेले मांस आणि चिकनची पिसे ही सर्व घाण नाल्यात टाकले जाते. सध्या नेरळ गावातील टॅक्सी स्टँड तसेच नेरळ पोलीस ठाणे जवळील पुलावरून खाली नाल्यात आणि सर्वाधिक कचरा हा स्मशानभूमी जवळ टाकला जातो. त्याचा परिणाम स्मशानभूमी येथे कार्यासाठी आलेले ग्रामस्थ आणि पाहुणे यांना दुर्गंधीमुळे त्या ठिकाणी काही उभे राहता येत नाही. दुसरीकडे स्मशानभूमी परिसरातून एक रस्ता मोहाची वाडी आणि अन्य आदिवासीवाडीकडे जात असतो, त्यामुळे त्या भागातील लोकांना देखील दुर्गंधी सहन करावी लागते.
नेरळ ग्रामपंचायतकडून सायंकाळी आठ वाजता ग्रामपंचायतचे घंटा गाडी ही नेरळ बाजारपेठमध्ये जाते आणि तेथून सर्व कचरा उचलून नेत असते. त्यात चिकन आणि मच्छी विक्रेते यांच्याकडील मांस हे प्रामुख्याने उचलून नेले जाते. तरीदेखील स्मशानभूमी परिसरात कचरा टाकण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षापूर्वी कारवाई केली होती. आता पुन्हा एकदा नेरळ ग्रामपंचायत कचरा टाकणार्या चिकन व्यवसायिक यांच्या कारवाईचा बडगा उगारला पाहिजे अशी मागणी जेष्ठ ग्रामस्थ सूर्यकांत चंचे यांनी केली आहे.
बाजारात व्यवसाय करणार्या चिकन विक्रेते यांना सूचना देणार असून तरी देखील अशी कृत्य करणार्यावर पोलीस कारवाई केली जाईल.
गणेश गायकर
ग्रामविकास अधिकारी