उष्णतेमुळे समुद्रकिनारी सन्नाटा
| मुरूड | प्रतिनिधी |
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार मुरूडमध्ये कालपासून सूर्यनारायण आग ओकत आहे. त्यामुळे मुरुडचा पारा 37 अंशांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम मुरूडकरांच्या अंगातून प्रचंड घामाच्या धारा वाहात आहेत. उन्हामुळे पर्यटकही फिरकत नसल्याने समुद्रकिनारी सन्नाटा पसरला आहे.
उन्हाची दाहकता इतकी आहे की, एक मिनीटदेखील उन्हात उभे राहू शकत नाही. या उन्हामुळे अंग अक्षरशः भाजून निघत असून, याचा परिणाम व्यापारावर, पर्यटन व्यवसायावर झाला आहे. बाजारपेठेत ग्राहक, तर समुद्रकिनारी पर्यटक फिरकत नाहीत. जो तो आपापल्या घरात, तर पर्यटक लॉजींगमध्ये बसून राहणे पसंत करीत आहेत.