पनवेल | वार्ताहर |
सद्याच्या उन्हाळ्यामध्ये पनवेल तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव, वाडी, वस्तीस टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील तेरा गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समिती पनवेल तर्फे देण्यात आली आहे.
मे महिना उजाडून 14 दिवस होऊन गेले आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र जाणवू लागलेला आहे. उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अंगाची काहिली होत आहे. अनेक जण दुपारचा प्रवास टाळत आहेत, मात्र तरी देखील उष्णता कमी होताना दिसून येत नाही. सूर्यदेव आग ओकू लागलेला आहे. त्यामुळे पाण्याची तीव्रता जाणवू लागली आहे. पनवेल तालुक्यात आणि शहरात पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन प्रशासन करत आहेत. विहिरीतील पाणी, बोरवेल मधील पाणी खोल गेलेले आहे. अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठलेला पाहायला मिळतो. नद्या देखील आटल्या आहेत. त्यामुळे दूषित पाणी प्यावयास लागते . तर काही ठिकाणी पाण्याचा सर्रासपणे अतिवापर केला जात आहे. याकडे ग्रामपंचायत ने लक्ष घालणे गरजेचे आहे.पनवेल तालुक्यातील माडभुवन, कसळखंड, आष्टे, फणसवाडी, शिवाजीनगर, आरीवली, हाल टेपवाडी, तारा टेप, घेरावाडी, कोरळ, गावदेवी आदिवासी वाडी, शिरढोण, शिरढोण पाडा या तेरा गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी पाच टँकर उपलब्ध करण्यात आले आहेत. 12 हजार लिटरचे पाच टँकर द्वारे या 13 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पंचायत समिती, पनवेल यांच्यातर्फे देण्यात आली.