| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत नगरपरिषद हद्दीत पाणीपुरवठा वेळेत आणि व्यवस्थितरित्या व्हावा, तसेच पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या समजावून घेण्यासाठी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक बोलावली होती.
नगराध्यक्ष जोशी यांच्या दालनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणीपुरवठा सभापती वैशाली मोरे, नगरसेवक राहुल डाळिंबकर, बळवंत घुमरे, प्राची डेरवणकर, स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, भारती पालकर, सुवर्णा निलधे, माजी नगरसेवक दीपक मोरे, तसेच जल अभियंता अभिमन्यू येलवंडे, पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी प्रत्येक विभागातील वॉलमन उपस्थित होते.
कर्जत नगर परिषद पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत पाणीपुरवठा करत असताना होत असणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. कर्जत नगरपरिषद हद्दीत योग्य पाणीपुरवठा होण्यासाठी वेळेचे नियोजन प्रायोगिक तत्त्वावर करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
दहिवली विभागात संध्याकाळी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, ज्या ज्या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्या ठिकाणी तपासणी करणे, गळती असलेल्या ठिकाणी ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना नगराध्यक्ष जोशी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या, तसेच पाणीपुरवठ्याची संबंधित सर्व कर्मचारी आणि वॉलमन यांच्या समस्याही जाणून घेण्यात आल्या.