आग विझविण्यासाठी सरपंच हर्षदा मयेकरचा पुढाकार
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव बंदर परिसरातील सुरूच्या बनातील जंगलात आग लागली होती. या आगीत सुरुच्या बनातील अनेक झाडे जळून नुकसान झाले. सरपंच हर्षदा मयेकर यांनी पुढाकार घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत कर्मचारी, वन अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थांच्या मदतीने गुरुवारी (दि. 5) सायंकाळी ही आग आटोक्यात आणण्यत यश आले. ही आग पेटत्या सिगारेटसह चुलीवर जेवण बनविताना उडालेल्या ठिणगीमुळे लागल्याची शक्यता वर्तविला जात आहे.
नागाव बंदर परिसरातील सुरूच्या बनातील जंगलात गुरुवारी सायंकाळी आग लागली. बंदर परिसरातील सुरूच्या बनातील जंगलात आग लागल्याची माहिती मिळताच सरपंच हर्षदा मयेकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने वेगवेगळ्या मार्गाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. वन अधिकारी तायडे, हटवार, भोईर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मानकर, ग्रामस्थ आदी सर्वांनी मिळून ही आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ही आग सिगारेटसह चुलीवर जेवण बनविताना उडालेल्या ठिणगीमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या निष्काळजीपणामुळे अनेक झाडांचे नुकसान झाले. सुरुच्या बनातील जंगलामध्ये वहिवाट असणाऱ्या पक्षीसह काही जंगली प्राण्यांवरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे. ठिणगीमुळे आग लागणार नाही, याचे देखील भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे, असे सरपंच हर्षदा मयेकर यांनी आवाहन केले आहे.







