| बंगळुरू | वृत्तसंस्था |
सॅफ फुटबॉल अजिंक्यपदाचा अंतिम सामना गतविजेता भारत आणि कुवेत यांच्यात मंगळवारी रात्री खेळला गेला. यजमान भारताने कुवेतचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 असा पराभव करत नवव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धा जिंकली. या विजयासह भारतीय संघाने आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाने नेशन्स कप आणि इंटरकॉन्टिनेंटल कप जिंकला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर स्टेडियममध्ये जे दृश्य पाहायला मिळाले ते वर्षानुवर्षे चाहत्यांच्या स्मरणात राहील.
एकसुरात गायले वंदे मातरम –
भारत आणि कुवेत यांच्यातील रोमहर्षक अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 30,000 चाहत्यांनी बंगळुरू येथील कांतेरावा स्टेडियमवर गर्दी केली होती. सामना संपताच सुनील छेत्रीने चाहत्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. तेव्हाच संपूर्ण स्टेडियममध्ये वंदे मातरमचे गाणे गुंजू लागले. छेत्री आणि चाहते हे गाणे एकत्र गाताना दिसले. हळूहळू संपूर्ण टीम इंडिया चाहत्यांसोबत माँ तुझे सलामम गाताना दिसली. सगळीकडे फक्त देशभक्ती दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
सुनील छेत्रीने मानले चाहत्यांचे आभार –
सामना संपल्यानंतर सुनील छेत्रीने चाहत्यांचे आभार मानले. या उत्कंठावर्धक सामन्यात बंगळुरूचे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होत. विजयानंतर छेत्रीने सांगितले की, हा सामना अजिबात सोपा नव्हता पण चाहत्यांनी चाहत्यांनी पाठिंबा देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. छेत्री बेंगळुरू एफसीकडूनही खेळतो.
गोलकीपर गुरप्रीत सिंग संधूने निर्णायक पेनल्टी वाचवण्यासाठी डायव्हिंग केले. त्यामुळे भारताने शूटआऊटमध्ये कुवेतचा 5-4 असा पराभव करून नवव्यांदा सॅफ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 120 मिनिटांचा खेळ संपेपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटच्या पाच फेर्यांनंतरही स्कोअर 4-4 होता, त्यानंतर महेश नोरेमने गोल केला. यानंतर भारताचा गोलरक्षक गुरप्रीत संधूने डायव्हिंग करत खालिद हाजियाचा फटका अडवला. अंतिम फेरीत कुवेतचा पराभव करून भारताने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने नवव्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. भारत यापूर्वी 1993, 1997, 1999, 2005, 2009, 2011, 2015 आणि 2021 मध्ये चॅम्पियन बनला होता. स्पर्धेच्या 14 वर्षांच्या इतिहासात, भारत नऊ वेळा चॅम्पियन म्हणून उदयास आला आहे आणि चार वेळा उपविजेता ठरला.