आढावा घेण्याची उपायुक्तांवर आली वेळ
| रायगड | प्रतिनिधी |
घरी एखादा पाहुणा येणार असला की, घर कस आपण टापटीप, स्वच्छ ठेवतो. त्यातच जर का पाहुणा अती महत्वाचा असला तर घराचे सुशोभिकरण देखील करतो. परंतू तोच पाहुणा आला नाही तर यजमानांचा चांगलाच हिरमोड होतो आणि केलेला खर्च देखील वाया जातो. अशीच परिस्थिती आज रायगड जिल्हा परिषद प्रशासनावर ओढवल्याचे दिसून आले. प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यासाठी कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर येणार होते. मात्र आयत्या वेळी त्यांनी दांडी मारल्याने बट्ट्याबोळ झाला. उपायुक्तांवरच आढावा घेण्याची वेळ आली. तसेच जिल्हा प्ररिषद प्रशासनाला रेड कार्पेट गुंडाळून ठेवावे लागले.
रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हे कामकाज पाहत आहेत. रायगड जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने जिल्हा परिषदेचा गाडा प्रशासना मार्फत हाकण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, महिला व बालकल्याण, कृषी, समाज कल्याण, आरोग विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण यासह अन्य विभाग कार्यरत आहेत. नागरिकांच्या विकासा संबधी देखील विविध कामे, योजना अथवा सेवा देण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरु असते. सध्या हे सर्व विभाग हे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अंमलाखाली आहेत.
प्रशासकीय पातळीवर कामकाज सुरळीत सुरु आहे का याची पाहणी आयुक्तांमार्फत करण्यात येते. हा कामाचाच भाग आहे. त्यानुसार बुधवारी (दि.5) कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर हे रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येणार होते. त्यांनीच सदरची तारीख आणि वेळ दिल्याने ही बैठक बोलवण्यात आली होती. डॉ. कल्याणकर यांना टापटीपपणा खूप आवडतो. ते जेव्हा रायगडचे जिल्हाधिकारी होते. तेव्हापासूनच सर्वांना हे माहिती आहे. मात्र ते वेळेवर कधीच आलेले नाहीत हे देखील तितकेच खरे आहे. जिल्हाधिकारी असताना त्यांनी एखादी बैठक बोलवली आणि ती वेळेत सुरु झाली असेल असे खचितच घडले असावे. साहेब येत नसल्याने अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तिष्ठत बसावे लागत होते. खासगीमध्ये याबाबत काही अधिकारी नाराजी देखील बोलवून दाखवत होते.
जिल्हा परिषद मध्ये डॉ. कल्याणकर येणार असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रेडकार्पेट टाकले होते. ठिकठिकाणी फुल झाडांच्या कुंड्या ठेवल्या होत्या. कॉरिडॉरमध्ये सुगंधी फ्रेशनर पसरला होता. स्वागतासाठी गुलाब पुष्पांचे भले मोठे गुच्छ तयार ठेवले होते. बैठकीची तयारी झाली. 11 वाजता आयुक्त डॉ. कल्याणकर येणार होते. मात्र 12 वाजून गेले तरी, आयुक्तांचा पत्ता नव्हता. काही कालावधीनंतर कळले की, आयुक्तांचा दौरा रद्द झाला. त्यांच्या ऐवजी गिरीश भालेराव उपायुक्त (आस्थापना) आणि डि.व्हाय.जाधव उपायुक्त (विकास) यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित झाले. त्यांनीच डॉ. कल्याणकर यांच्या गैर हजेरीत जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली. याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी निलेश घुले उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेमध्ये ते पहिल्यांद येणार होते म्हणून तयारी केली होती. मात्र काही कारणांनी डॉ. कल्याणकर येऊ शकले नाहीत. उपायुक्त गिरीश भालेराव आणि उपायुक्त डि.व्हाय.जाधव हेच आढाव घेतील.
डॉ. किरण पाटील, सीईओ, रायगड जिल्हा परिषद