| रोहा | प्रतिनिधी |
दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका व अंबा या नद्या दुथडी भरून वाहत असून अति मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळांना जिल्हाधिकारी रायगड यांनी सुट्टी जाहीर केल्यामुळे सकाळच्या सत्रातील शालेय विद्यार्थ्यांना लवकर घरी पाठविण्यात आले आहे. दुपारी एकनंतर कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रोहा व अष्टमी या शहरांना जोडणाऱ्या जुन्या पुलावर पाणी आल्याने या पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. खांबेरे ग्रामपंचायत हद्दीतील गायचोळ आदिवासी वाडी येथील रमेश वाघमारे यांच्या घराची पडवी कोसळली असून, मुक्ता घोगरे यांच्या घराचेदेखील नुकसान झाले आहे. महसूल विभागाने या घरांची पाहणी केली असून, त्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नागोठणे बसस्थानक व बाजारपेठ यांना पुराचा फटका बसला असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
महसूल व पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहर व तालुक्यातील काही सखल भागात पाणी साचले असले तरी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. पावसाने काहीशी ओढ दिल्याने बळीराजा धास्तावला होता. पण सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे लावणीच्या कामांना वेग मिळणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे.